डोंबिवली – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाच्या (सीआयएसएफ) हैदराबाद येथील प्रशिक्षणादरम्यान डोंबिवलीतील रहिवासी असलेले जवान बसंत सिंग यांचा हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रविवारी मृत्यू झाला. डोंबिवलीतील गणेशनगर भागातील मोक्षधाम स्माशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

बसंत सिंग यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले असा परिवार आहे. ते डोंबिवली पश्चिमेत गरीबाचापाडा भागातील अनमोलनगरी गृहसंकुलात राहत होते. बसंत सिंग यांच्या निधनाबद्दल शहरात शोक व्यक्त केला जात आहे. बसंंत सिंग हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळात नोकरी करत होते. उत्तम शरीरयष्टी असलेले बसंत सिंग व्यायामपटू होते. नियमित पहाटे उठून चालणे, धावणे हा त्यांचा नियमितचा व्यायाम होता. प्रत्येक नागरिकाने नियमित सकाळचा व्यायाम केला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. कौटुंबिक जिव्हाळा असलेले हे कुटुंब होते. सोसायटीतील सर्व उपक्रमांमध्ये हे कुटुंब सहभागी होत होते. आपल्या सोसायटीतील एक तगडा जवान अचानक मृत्यू पावल्याने ते वास्तव्य करत असलेल्या अनमोलनगरीत शोककळा पसरली आहे.

काही दिवसापूर्वी बसंत सिंग आपल्या नियमितच्या प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे गेले होते. पहाटे उठून दैनंदिन सराव करणे आणि प्रशिक्षणात सहभागी होणे हा त्यांचा शिरस्ता होता. पहाटे उठून धावणे आणि इतर व्यायाम करून दिवसाच्या ते प्रशिक्षणात सहभागी होत होते. रविवारी प्रशिक्षणात सहभागी झाल्यानंतर अचानक त्यांना हदयविकाराचा तीव्र झटका आला. ते प्रशिक्षण शिबिरात कोसळले. इतर शिबिरार्थी जवानांनी त्यांना तातडीने सर्वोच्च उपचारी वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. पण तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी त्यांचे पार्थिव केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील घरी आणण्यात आला. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाचे वरिष्ठ, कनिष्ठ असे एकूण शंभरहून अधिक जवान उपस्थित होते. स्थानिक पोलिसांनी यावेळी जवान बसंत सिंग यांना अखेरची मानवंदना दिली.

गणेशनगर येथील मोक्षधाम स्मशानभूमीत बसंत सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डोंबिवली शहरातील विविध क्षेत्रातील मंडळी, स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या एका जवानाचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंत्यसंस्काराच्यावेळी बसंत सिंग यांचे कुटुंबीय, नातेवाईक, नागरिक अधिक संख्येने उपस्थित होते. आपला व्यायाम शाळेतील एक ज्येष्ठ मार्गदर्शक, व्यायामपटू हरपल्याने बसंत सिंग यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र शोक व्यक्त केला.