डोंबिवली : नागरिकांची जमीन मालमत्ता विषयक कामे लवकर मार्गी लावण्यासाठी डोंबिवलीतील नगरभूमापन अधिकारी पद शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे. या पदासाठी डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर भागात खाडीकिनारी कल्याण-डोंबिवली पालिकेकडून सर्वसमावेश आरक्षणाखाली मिळालेल्या अडगळीच्या जागेत हे कार्यालय सुरू करण्यात आल्याने नागरिक, कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नगरभूमापन विभागाच्या माध्यमातून जमीन मालमत्ता प्रपत्रे, सीटी सर्व्हे क्रमांकाची कामे केली जातात. ही कामे बहुतांशी ज्येष्ठ नागरिक करतात. डोंबिवली पूर्वेत सुनीलनगरमध्ये बहिणाबाई चौधरी उद्यानाच्या बाजुला पालिकेच्या जागेत मागील काही वर्षापासून नगरभूमापन विभागाचे कार्यालय आहे. हे कार्यालय नागरिकांना ये-जा करण्याच्या दृष्टीने सोयीस्कर आहे. पंधरा वर्षापासून याठिकाणी नगरभूमापन विभागाचा कारभार सुरळीतपणे सुरू होता. मग हे कार्यालय का हलविण्यात येत आहे, असे प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहेत. डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर भागात सुरू करण्यात येणारे कार्यालय उल्हास खाडी किनारी अडगळीच्या जागेत आहे. याठिकाणी नगरभूमापन विभागाला कल्याण डोंबिवली पालिकेकडून सर्वसमावेश आरक्षण क्षेत्रातील बांधिव मालमत्ता मिळाली आहे. त्यामुळे या जागेला पसंती देऊन नगरभूमापन विभागाने या जागेला पसंती दिली असल्याचे समजते.

नागरिकांना आर्थिक भूर्दंड

गणेशनगर भागात रिक्षेने येण्यासाठी एका फेरीसाठी रिक्षा चालक ८० रूपये मागतो. शेअर रिक्षेने येण्यासाठी २० ते २५ रूपये मोजावे लागतात, असे नागरिकांनी सांगितले. या भागात स्वतंत्रपणे रिक्षा करून प्रवासी येण्याचा प्रयत्न करू लागला तर रिक्षाचालक आपल्या मनासारखे भाडे मिळत नाही तोपर्यंत प्रवासी भाडे घेत नाही. त्यामुळे गणेशनगर नगरभूमापन कार्यालयात यायचे असेल तर नागरिकांना दोनशे रूपये तयार ठेवावे लागणार आहेत, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. प्रशासकीय कामे नगरभूमापन पश्चिम कार्यालयात करून नागरी संपर्काची सर्व कामे पूर्वेतील सुनीलनगरमधील कार्यालयातून करण्यात यावीत. नागरिकांचा गणेशनगर भागात जाण्याचा त्रास वाचेल, अशी नागरिकांची मागणी आहे.

राजकीय दबाव

मागील पाच ते सहा वर्षात कोणीही नगरभूमापन विभागाला सुनीलनगरमधील बहिणाबाई चौधरी उद्यानाजवळील कार्यालय खाली करण्यास सांगितले नव्हते. आता पालिका निवडणूक झाल्यापासून काही राजकीय मंडळींचा पालिकेच्या या कार्यालयाच्या स्थलांतराच्या मागे लागले आहेत अशी माहिती काही स्थानिकांनी दिली. संबंधित राजकीय मंडळी कार्यालयात लवकर जागा खाली करा, म्हणून तगादा लावत असल्याच्या तक्रारी आहेत.