डोंबिवली – इंदूर शहराच्या धर्तीवर डोंबिवली शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याचा निर्धार डोंबिवलीतील विविध क्षेत्रात सक्रिय असलेल्या ५० संस्थांनी केला आहे. शहर मनापासून स्वच्छ, सुंदर, हरित करायचे असेल तर मग त्यासाठी चर्चा, बैठका यात वेळ न घालविता त्यासाठी सुधारित आराखडा तयार करण्याच्या कामाला लागू या, असे वक्तव्य करून कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या उपक्रमाला हिरवा कंदिल दाखविला.

डोंबिवलीतील सुमारे ५० संस्थानी एकत्र येऊन निर्माण केलेल्या नागरी अभिवादन न्यास या शिखर संस्थेतर्फे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शहरातील विविध क्षेत्रातील ७५ जाणकार नागरिक, कल्याण डोंबिवली पालिकेचे उपमहापौर राहुल दामले, आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, नगरसेविका खुशबू चौधरी, निवृत्त पालिका अधिकारी रोहिणी लोकरे, पद्मश्री गजानन माने आणि अनेक पर्यावरण कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

उपायुक्त कोकरे यांनी पर्यावरण कायद्याखाली १ एप्रिल २०२६ पासून अमलात आलेले घनकचराविषयक नवीन नियम, या नियमांचे उल्लंघन केल्यावर होणारी दंडाची तरतूद, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे यांची माहिती दिली. घनकचरा वर्गीकरण कसे करावे याचे मार्गदर्शन केले.

उपमहापौर दामले यांनी नागरिकांनी पर्यावरणाच्या आणि कचऱ्याच्या बाबतीत कसे जागरूक राहिले पाहिजे आणि आता पाऊस सुरू झाला आहे तर झाडे लावणे किती महत्वाचे आहे आणि त्यामध्ये महापालिका काय मदत करू शकते याची माहिती दिली.

आयुक्त गोयल यांनी चर्चा नको तर सरळ कृती आराखडा बनवू या, अशी थेट भूमिका घेऊन शहरात दररोज निर्माण होणारा ७०० टन कचरा कमी कसा करता येईल याची रूपरेषा मांडली. कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि तो कमी करणे याबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता कोणत्या विभागातील सोसायट्या, चाळी आणि वस्त्यांमध्ये आहे हे निश्चित करण्यात आले आहे, असे सांगून त्या विभागात कोणती संस्था काम करण्यास तयार आहे याची यादी बनविण्याचे आवाहन केले.

या कृती आराखड्यात महापालिकेला नागरिकांनी , संस्थांनी आणि नगरसेवकांनी कशी मदत करावी हे स्पष्ट करून सांगितले अनेक संस्थांनी तत्काळ सहकार्य करण्याचे कबूल केले. शहरात आणि इतरत्र झाडे लावण्यासाठी महापालिका कशी मदत करील याचा आराखडाही सादर केला. या वर्षात सव्वा लाख झाडे लावण्याचे आणि जगविण्याचे उद्दिष्ट आहे असे सांगितले. न्यासाचे सचिव प्रवीण दुधे यांनी स्वयंस्फूर्तीने पर्यावरण संवर्धन कार्य करणाऱ्या संस्थांची आणि व्यक्तींची माहिती सभेला दिली आणि आपणही काही केले पाहिजे अशी उर्मी उपस्थितांच्या मनात निर्माण केली

उपाध्यक्ष माधव जोशी यांनी गेल्या काही वर्षात शहर स्वच्छतेत खूप सुधारणा झाली असल्याचे नमूद केले आणि ‘बनू इंदूर ‘ हा सामूहिक निर्धार व्यक्त केला. आज आपण हे केले नाही तर आपल्या मुलांचे आणि नातवंडांचे भविष्य काळेकुट्ट असेल असा इशाराही दिला.

ज्या संस्थांना किंवा नागरिकांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी गणेश मंदिरात प्रवीण दुधे यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.