डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील मध्यवर्ति ठिकाणच्या मानपाडा रस्त्यावरील चार रस्ता चौकातील काॅमर्स प्लाझा संकुलात कल्याण डोंबिवली पालिकेचे ग आणि फ प्रभागाचे नागरी सुविधा केंद्र आहे. डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली, पेंडेसनगर, सारस्वत काॅलनी, सुनीलनगर, आयरे, म्हात्रेनगर, रामनगर परिसरातील नागरिक या केंद्रात मालमत्ता कर, पाणी देयक भरणा, जन्म मृत्यू दाखल्यासाठी येतात. या नागरी सुविधा केंद्रात गेल्या दोन महिन्यापासून कर्मचाऱ्यांची संख्या घटल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी ताटकळत रांगेत उभे राहावे लागते.
दररोज शेकडो नागरिक या केंद्रात येतात. हे केंद्र यापूर्वी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळ होते. ही इमारत धोकादायक झाल्याने हे नागरी सुविधा केंद्र चार रस्त्यावरील काॅमर्स प्लाझा व्यापारी संकुलात स्थलांंतरित करण्यात आली आहे. या नागरी सुविधा केंद्रात यापूर्वी एकूण सात कर्मचारी कार्यरत होते. या नागरी सुविधा केंद्रातून मालमत्ता कर शुल्क भरणा, पाणी देयक शुल्क भरणा, जन्म, मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी आणि प्रमाणपत्र वितरण, नागरिकांच्या तक्रारी स्वीकारणे ही कामे केली जातात.
यापूर्वी या नागरी सुविधा केंद्रात सात कर्मचारी असल्याने नागरिकांची कामे झटपट होत होती. गेल्या दीड महिन्यापूर्वी या केंद्रातील चार कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्तीने बदल्या झाल्या. हे कर्मचारी पदोन्नत्तीने गेल्यानंतर त्यांच्या जागी पर्यायी कर्मचारी देण्याची मागणी करणारे प्रस्ताव नागरी सुविधा केंद्रातून सामान्य प्रशासन विभागाला पाठविण्यात आले आहेत. पण त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे समजते. या केंद्रातील आताचा एक कर्मचारी मुका आहे. एक दिव्यांग, एक महिला कर्मचारी याठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे या केंद्रातील एकेका कर्मचाऱ्याला एकावेळी दोन ते तीन कामे करावी लागत आहेत.
कामे झटपट होत नसल्याने नागरिक तो राग कर्मचाऱ्यांवर काढत आहेत. कर शुल्क भरणा आणि दाखले घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, वृध्द मंडळी येतात. त्यांना कर्मचाऱ्यांअभावी ताटकळत उभे राहावे लागते. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही त्यामुळे कामाचा भार वाढला आहे, असे सांगुनही नागरिक काहीही ऐकण्यास तयार होत नाहीत. जन्म मृ्त्यू दाखल्याची कामे यापूर्वी दोन कर्मचारी करत होते. मालमत्ता कर, पाणी देयक शुल्क भरणा करून देण्यासाठी यापूर्वी दोन ते तीन कर्मचारी एकावेळी सक्रिय होते. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रात येणाऱ्या नागरिकांची कामे झटपट होत होती. आता नागरिकांना अर्धा ते पाऊण तास उभे राहावे लागते.
डोंबिवली पूर्वेतील नागरी सुविधा केंद्र हे महसूल मिळण्याचे मोठे साधन आहे. या केंद्रातच पुरेसे कर्मचारी नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अधिक माहितीसाठी पालिकेचे सिस्टिम ॲनालिस्ट प्रमोद कांबळे यांना संपर्क साधला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
