शहापूर : नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला. रोहन लोडगे (३२) आणि अवंतिका लोडगे (२९) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवली येथील राहुल नगर परिसरात वास्तव्यास असलेले रोहन आणि अवंतिका शुक्रवारी सकाळी कामानिमित्ताने इगतपुरी येथे दुचाकीवरून गेले होते. कामे आटोपल्यानंतर ते मुंबई नाशिक महामार्गाने आटगाव भागात आले असता, सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाता प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
