डोंबिवली : राज्यघटनाकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसिध्द करणाऱ्या पुण्यातील एका नागरिका विरूध्द डोंबिवली पूर्वेतील इंदिरानगरमधील एका कायद्याच्या अभ्यासकाने डाॅ. आंबेडकर यांची बदनामी, बौध्द धर्माच्या भावना दुखावल्याबद्दल अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने (ॲट्राॅसिटी) तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

किरण श्रीरंग शिंदे हे कायद्याचे अभ्यासक (एल. एल. एम.) आहेत. ते डोंबिवली पूर्वेतील इंदिरनगरमध्ये कुटुंबीयांसह राहतात. त्यांचे वडील रिक्षा चालक आहेत. शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पुणे येथील रमेश भिडे यांच्या विरूध्द ॲट्राॅसिटीचा, भारतीय न्याय संहिता २९९, १९६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

किरण शिंदे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या शनिवारी मी घरी होतो. त्यावेळी मोबाईलच्या माध्यमातून फेसबुक संदेश वाचत असताना, आपणास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी, त्यांची प्रतिमा मलीन करणारा एक संदेश दिसला. त्या संदेशाचा मुख्य कर्ता कोण हे तांत्रिक माहितीच्या आधारे तपासले. त्यावेळी तो मजकूर पुणे येथील रमेश भिडे नावाच्या व्यक्तीने लिहिल्याचे समजले. डाॅ. बाबासाहेब यांच्या विषयी लिहिलेला मजकूर वाचून आपणास धक्का बसला. या मजकुराचे पुरावे म्हणून त्याच्या प्रतिमा आपण काढून ठेवल्या.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना होईल, ती सर्वांना दिसेल अशा पध्दतीने गैर अनुसूचित जातीच्या रमेश भिडे नावाच्या व्यक्तीने समाज माध्यमांत हा मजकूर प्रसारित केला आहे. त्यामुळे आपणास आणि बौध्द समाजाला श्रध्देय असणाऱ्या डाॅ. बाबासाहेबांविषयी विटंबना करणारा मजकूर प्रसारित करून आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच, दोन जाती, धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भिडे यांनी केला आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अशाप्रकारचा बदनामीकारक मजकूर समाज माध्यमांत प्रसारित करून गुन्हा दाखल व्यक्तीने द्वेषपूर्ण कृत्य केले आहे. या वादग्रस्त मजकुरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण, प्रतिभेवर शिंतोडे उडवण्यात आले आहेत. या मजकुराचे सर्व तपशील आपल्या ताब्यात आहेत. समाज तेढ, एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा हा मजकूर असल्याने हा मजकूर लिहिणाऱ्या रमेश भिडे यांच्या विरोधात आपण तक्रार करत आहोत, असे तक्रारदार कायद्याचे अभ्यासक किरण शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास तांत्रिक माहितीचा आधार घेऊन सुरू करण्यात आला आहे.