डोंबिवली – येथील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कोपर भागातील एका विद्यार्थ्याला आणि त्याच्या साथीदाराला डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील तीन सराईत गुंडांनी शिवीगाळ करत दगडी डोक्यात मारून जीवघेणी मारहाण केली. यामध्ये हे दोन्ही तरूण गंभीर जखमी आहेत. या तिन्ही गुंडांवर विष्णुनगर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या तिन्ही गुंडाना अटक केली आहे.
अंकित नेताजी पाटील असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कोपरगाव भागात कुटुंबीयांसह राहतो. यश म्हात्रे अंकितच्या मित्राचे नाव आहे. तोही गुंडांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. प्रितेश उर्फ राम्या बाळू म्हात्रे (३१), सचिन हरी म्हात्रे (३३), योगेश सुर्वे (२५) अशी गुंडांची नावे आहेत. हे तिघेही देवीचापाडा येथील रहिवासी आहेत. देवीचापाडा सत्यवान चौकातील खंडोबा मंदिर येथे या गुंडांचा अड्डा असतो.
डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावर एका गुंडांची खूप दहशत होती. या गुंडाने दोन वर्षापूर्वी काही पत्रकारांना रात्रीच्या वेळेत मारहाण केली. हा विषय पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गांभीर्याने घेतला. भर रस्त्यात या गुंडाची वरात काढली. तेव्हापासून या गुंडाची महात्मा फुले रस्ता भागातील दहशत ओसरली.
अशाच पध्दतीने देवीचापाडा सत्यवान चौक भागात मागील काही वर्षापासून या सराईत गुंडांची दहशत आहे. या गुंडांवरील गंभीर गुन्हे विचारात घेऊन पोलिसांनी त्यांना तडीपार करण्याची मागणी देवीचापाडा भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. देवीचापाडा भागातील एक भूमाफिया आपले अंगरक्षक म्हणून या गुंडांना पोसत असल्याची चर्चा आहे.
विद्यार्थ्याला मारहाण
मागील चार दिवसापूर्वी अंकित पाटील आणि त्याचा मित्र यश म्हात्रे हे देवीचापाडा येथील हिरवाई ढाबा येथे भोजन करण्यासाठी गेले होते. तेथून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटारीतून ते घरी परत येत होते. देवीचापाडा सत्यवान चौक खंडोबा मंदिर येथून जात असताना रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने एक मोटार उभी करून ठेवण्यात आली होती. हे वाहन बाजुला करण्यासाठी अंकित यांनी आपल्या वाहनाचा भोंगा वाजवला. वाहन बाजुला करण्याची सूचना तेथे उभ्या असलेल्या राम्या, सचिन आणि योगेश यांना केली. त्याचा राग या गुंडांना आला.
या तिघांनी अंकितच्या मोटारीवरील काचांवर बुक्के मारून काच फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हातात दगडी घेऊन शिवीगाळ करत अंकित आणि यशला बाहेर येण्याचा इशारा केला. आम्ही काही केले ननसताना शिवीगाळ का करता असे प्रश्न अंकित आणि यशने करताच या तिन्ही गुंडांनी अंकित आणि यशला हातामधील दगडीने मारहाण सुरू केली. तिघे जण या दोन्ही विद्यार्थ्यांवर तुटून पडले. यावेळी यशच्या डोक्याला दगडीचा घाव बसल्याने तो रक्तबंबाळ झाला. अंकितला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या तिघांच्या तावडीतून सुटून अंकितने पोलीस ठाणे गाठले. यशला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी तातडीने हालचाल करून या तिन्ही सराईत गुंडांना अटक केली आहे.
