डोंबिवली – नवी मुंबईतील ऐरोली वनपरिक्षेत्रांतर्गत ठाणे खाडी किनारी फ्लेमिंगो अभयारण्य उभारणीचे काम करणाऱ्या एका सरकारी ठेकेदाराने डोंबिवलीतील एका व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीची ५१ लाख ६२ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या पती, पत्नीने या सरकारी ठेकेदाराकडे पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने ‘माझ्याकडे सारखे पैसे मागायचे नाहीत. माझी वरपर्यंत ओळख आहे. मला सारखा फोन केला तर तुम्हाला संपवून टाकू,’ अशी धमकी दिली आहे. या फसवणूक आणि अपहार प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वासुमिया अलिखान इनामदार (६०, रा. कासाबेला, पलावा, डोंबिवली) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ते बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. अंकित बापू ठोंबरे (४०, रा. शंकेश्वरनगर, सागाव, डोंबिवली) असे फसवणूक करणाऱ्या सरकारी ठेकेदाराचे नाव आहे. एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. मानपाडा रस्त्यावरील लोढा संकुल भागातील कादिर आणि अमरिन ट्रान्सपोर्ट दुकानातील बांधकाम साहित्य खरेदी करण्यावरून हा पैशाचा व्यवहार घडला आहे.
घटना काय आहे
तक्रारदार वासुमिया इनामदार यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सरकारी ठेकेदार अंकित ठोंबरे, त्यांचे भागीदार सहकारी जुबेर कुरेशी यांनी एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत आपल्या डोंबिवलीतील लोढा संकुल मधील मानपाडा भागातील कादिर आणि अमरिन ट्रान्सपोर्ट या दुकानातून बांधकामाचे साहित्य खरेदी केले होते. लोखंडी सळया आणि इतर बांधकामाचे साहित्य त्यांनी नवी मुंबईतील ऐरोली वनपरिक्षेत्र हद्दीत उभारण्यात येणाऱ्या फ्लेमिंगो अभयारण्य कामासाठी नेले होते. या बांधकाम साहित्याची एकूण किंमत ३५ लाख ५२ हजार ७९४ एवढी आहे. या बदल्यात आपणास ठेकेदाराने फक्त सात लाख रूपये परत केले आहेत. उर्वरित रक्कम द्यावी म्हणून तक्रारदाराने ठेकेदाराच्या मागे तगादा लावला होता.
ठेकेदार ठोंबरे यांनी तक्रारदार इनामदार यांच्या पत्नीस आपले कामाचे देयक शुल्क अडकले आहे. ते काढण्यासाठी बाबू लोकांना २० लाख रूपये द्यावे लागले. त्यामुळे आपल्याकडे पैसे राहिले नाहीत. त्यासाठी आपण मला पैसे द्यावेत अशी मागणी केली. इनामदार यांच्या पत्नीने एचडीएफसी बँकेतून स्वताच्या नावावर १७ लाख ४० हजार रूपयांचे कर्ज काढले. ही कर्जाची रक्कम ठेकेदार अंकित ठोंबरे यांच्या बँक खात्यावर जमा केली. ठोंबरे यांचे अडकलेले देयक शुल्क निघाले की आपली रक्कम आपणास परत मिळेल या विचाराने ही कर्जाऊ रक्कम इनामदार यांच्या पत्नीने उचलली होती. ठोंबरे यांनी इनामदार यांच्या पत्नीला कर्जाऊ रकमेतील फक्त दोन लाख १० हजार रूपये परत केले. कर्जाच्या रकमेचे हप्ते इनामदार यांच्या पत्नीचे नावे सुरू झाले होते.
हे हप्ते फेडण्यासाठी इनामदार यांची पत्नी ठोंबरे यांच्याकडे पैसे मागू लागली. ते टाळाटाळ करू लागले. त्यामुळे इनामदार यांच्या पत्नीचे कर्जाऊ रकमेचे व्याजासह २३ लाख १० हजार रूपये आणि तक्रारदार वासुमिया इनामदार यांच्या दुकानात बांधकाम साहित्य खेरदी केलेल्या लोखंडी आणि इतर सामानाचे येणे बाकी असलेले २८ लाख ५२ हजार ७९४ असे एकूण ५१ लाख ६२ हजार ७९४ रूपये सरकारी ठेकेदार अंकित ठोंबरे तक्रारदार इनामदार आणि त्यांच्या पत्नीला परत न करता त्यांच्या रकमेचा अपहार आणि फसवणूक केली आहे. हे पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला तर ‘आपण तुम्हाला संपवून टाकू. आमची वरपर्यंत ओळख आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे परत करणार नाही,’ अशी धमकी ठोंबरे यांनी इनामदार यांना दिली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.
