डोंबिवली – डोंबिवली पूर्व शहराच्या टिळकनगर भागातील टिळकनगर विद्यामंदिरासमोरील रस्त्यावर सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान एका भुरट्या चोराने एका बांधकाम व्यावसायिकाला दमदाटी करून लुटले. या व्यावसायिकाकडील एक लाखाहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने फसवणूक करून लुटून नेले. टिळकनगर या शांत भागात दिवसाढवळ्या अशा लुटीच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. राजकीय नेत्याच्या नावाने भुरट्याने ही लूट केली.

या फसवणूक प्रकरणी रूद्र पटेल (२१) या बांधकाम व्यावसायिकाने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पटेल यांनी तक्रारीत म्हटले आहे, मी घाटकोपर येथे राहतो. मी बांधकाम व्यावसायिक आहे. वडिलांसोबत हा व्यवसाय करतो. गोग्रासवाडी भागात आमच्या एका नवीन इमारतीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी मी दररोज सकाळी येतो. गेल्या आठवड्यात मी डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून टिळकनगर भागातून पायी गोग्रासवाडी दिशेने जात होतो. टिळकनगर शाळेच्या वळणावर आल्यावर मला खोकला आला. मी रस्त्याच्या कडेला जाऊन थांबलो. मोठी उबळ आल्याने मी रस्त्याच्या कडेला थुंकलो.

तेवढ्यात पाठीमागून एक इसम आला. तुम्ही रस्त्याच्या कडेला थुंकलात, पण ते थुंकणे बाजुने गेलेल्या महिलेच्या अंगावर उडाले आहे. त्या बाई या राजकीय नेते पाटील यांच्या पत्नी आहेत. पाटील यांना कळले तर तुम्हाला ते मारल्या शिवाय राहणार नाहीत, अशी धमकी देऊ लागला. तुम्ही त्या बाईंची माफी मागा, असे सांगून भुरटा तक्रारदार पटेल यांना टिळकनगर मधील बाळकृष्ण इमारतीच्या आडोशाला घेऊन गेला. तेथे पटेल यांना बसण्यास सांगितले. आता आपणास मारहाण होते की काय या भीतीने रूद्र अस्वस्थ होते. तुझे ज्या बाईंच्या अंगावर थुंकणे उडाले त्यांना तुझा मोबाईल पाहायचा आहे असे सांगून भुरट्याने रूद्र यांचा मोबाईल घेतला. तो परत केला. त्यानंतर बाईंना तुझे सोने पाहायचे आहे. असे सांगून रूद्र यांच्या गळ्यातील सोन्याचे ब्रेसलेट, सोनसाखळी, बोटामधील अंगठी भुरट्याने काढून घेतली. हे दागिने घेऊन तो बाईंना दाखविण्यासाठी बाहेर गेला. पुन्हा ते दागिने घेऊन पटेल यांच्या जवळ आला. आता पाटील साहेब येणार आहेत. त्यांच्याकडे तू माफी माग असे भुरटा बोलत होता. भुरटा तरूण पुन्हा रूद्र पटेल यांच्या जवळ आला. त्याने पाटील साहेब आले आहेत. त्यांना तुझे सोन्याचे दागिने पाहायचे आहेत असे सांगून रूद्रजवळील एक लाख २० हजाराचा सोन्याचा ऐवज काढून घेतला. तो राजकीय नेते पाटील यांना दाखविण्यासाठी नेण्याचा बहाणा करून भुरटा तेथून बाहेर पडला.

तो नंतर पुन्हा आला नाही. बराच उशीर झाल्यानंतर आपले सोने घेऊन गेलेला इसम परत येत नाही म्हणून रूद्र रस्त्यावर आले तर तेथे कोणी नव्हते. त्यामुळे भुरट्याने आपणास फसवून आपले सोन्याचे दागिने लांबविले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण रूद्र यांनी तपासले. त्यावेळी भुरटा सोन्याचा ऐवज घेऊन पसार होत असल्याचे आढळले. टिळकनगर पोलीस भुरट्याचा शोध घेत आहेत.