डोंबिवली – लग्नात आम्हाला गडगंज, मानपान काही दिले नाही, असा आरोप करत पैशांच्या मागणीसाठी डोंबिवलीतील एका गर्भवती महिलेचा पती, दोन नणंदा, सासू, सासरे छळ करत होते. लग्नाच्या वाढदिवशीही या कुटुंबीयांनी विविध कारणांवरून गर्भवती महिलेशी भांडण उकरून काढले. यावेळी दोन्ही नणंदांनी गर्भवती महिलेच्या वडिलांना शिवीगाळ केली. दोन्ही नणंदांनी गर्भवती महिलेला ढकलून दिले. पोटावर पडल्याने या महिलेच्या पोटात वेदना सुरू झाल्या होत्या.
एक महिन्यानंतर गर्भवती महिला वैद्यकीय तपासणीसाठी वाडिया रूग्णालयात गेली. तेव्हा तेथील डाॅक्टरांनी आपल्या गर्भाशयातील तीन महिन्याचे बाळ एक महिन्यापूर्वीच मृत झाले असल्याचे पीडितेला सांगितले. या सगळ्या प्रकाराने महिलेची मानसिक स्थिती बिघडली. आपल्या मुलीचा सासरी छळ होतो म्हणून वडिलांनी परेल येथून आपल्या गर्भवती मुलीला डोंबिवलीत आणले. परेल येथील सासरच्या घरातून बाहेर पडताना सासूने गर्भवती महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि इतर स्त्रीधन काढून घेतले. आणि पुन्हा सासरी येऊ नकोस अशी दटावणी केली.
आधारकार्डसाठी विनवणी
पोटात बाळ मृत असल्याने वाडिया रूग्णालयात दाखल होऊन तेथे गर्भवती महिलेवर वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी तक्रारदार महिलेला आपल्या आधारकार्डची गरज होती. ते परेल येथे सासरी राहिले होते. पीडित महिलेने सासरकडील मंडळींना संपर्क साधला. आपणास आधारकार्ड तातडीने पाहिजे, अन्यथा आपण पोलीस ठाण्यात तक्रार देऊ, असे सांगितले. आपणास पतीने आधारकार्ड आणून दिले. पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर घरात न घेण्याची आणि आधारकार्ड न देण्याची धमकी सासरच्या कुटुंबीयांनी पीडितेला दिली. दोन्ही नणंदांनी आपणास शिवीगाळ करत पोटावर ढकलल्याने आपल्या गर्भाशयातील बाळाला दुखापत होऊन ते मृत झाले होते. आपण पोलीस ठाण्यात तक्रार केली तर आपणास आधारकार्ड मिळणार नाही या विचाराने आपण दोन नणंदांविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. रुग्णालयात गर्भपाताची प्रक्रिया पार पडल्यानंतर महिला आपल्या माहेरी निघून आली.
एका नणंदेच्या पतीने पीडितेला आपण सासरच्या कुटुंबीयांना समजावून सांगतो. मग आपण घरी या असे सांगितले. त्यावेळी सासरच्या मंडळींनी नांदायला यायचे असेल तर पहिले तीन लाख रूपये घेऊन ये, असा निरोप दिला. पैशांच्या या सततच्या मागणीमुळे पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पाच लाख खर्च
पीडितेचे वडील पोलीस दलात होते. आपल्या मुलीचा विवाह त्यांनी परेल येथील डाॅ. एस. एस. राव रस्ता परिसरातील गृहसंकुलात राहणाऱ्या तरूणाबरोबर एप्रिल २०२४ मध्ये करून दिला होता. विवाहासाठी पीडितेच्या वडिलांनी पाच लाख खर्च, जावयासाठी मागणीप्रमाणे सोन्याचा ऐवज दिला होता. पीडितेचे पती साॅफ्टवेअर इंजिनीअर आणि ते निर्व्यसनी आहेत, असे सासरच्या मंडळींनी पीडितेला विवाहापूर्वी सांगितले. विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी रात्री पीडितेचा पती दारू पिऊन घरी आला. त्यानंतर तो नियमित मित्रांबरोबर दारू मेजवान्या करत होता. हा सगळा प्रकार पीडितेने सासरच्या कुटुंबातील सासू, सासरे, दोन नणंदा यांना सांगितला. याऊलट सासरच्या मंडळींनी तुम्ही आम्हाला लग्नात काही दिले नाही. त्यामुळे तुला आता काही बोलायचा अधिकार नाही. तू पतीच्या दारू व्यसनाबद्दल बाहेर काही बोलायचे नाही, अशी तंबी दिली. त्यानंतर सासरच्या कुटुंबीयांनी पैशांसाठी पीडितेचा छळ सुरू केला होता. विष्णुनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

