डोंबिवली : आपण आपल्या बँक खात्यांमधून काही गैरव्यवहार केले आहेत. गैरवर्तन करणारे काही लघुसंदेश महिलांना पाठवले आहेत. या गुन्ह्यांप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत. ‘ईडी’ही याप्रकरणाची चौकशी करणार आहे, अशी खोटी माहिती डोंबिवलीतील एका नोकरदाराला दोन बनावट सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणातून आपण तुम्हाला सहीसलामत बाहेर काढू असे आश्वासन देऊन दोन बनावट सीबीआय अधिकाऱ्यांनी या नोकरदाराकडून एकूण ७१ लाख १० हजार रूपये उकळले आहेत.

महेश मनोहर आगरकर असे तक्रारदार नोकरदाराचे नाव आहे. ते डोंबिवली एमआयडीसीत एका कंपनीत नोकरी करतात. ते डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी भागात कुटुंबीयांसह राहतात. आगरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप कुमार राव, करण शर्मा यांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

महेश आगरकर यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत दिलेली माहिती, अशी गेल्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात मला माझ्या मोबाईलवर एका इसमाने संपर्क केला. मी टेलिकाॅम रेग्युलेटरी ऑथरेटी (ट्राय) मधून बोलत आहे. तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही काही महिलांना त्रासदायक लघुसंदेश पाठवले आहेत. आपल्या विरूध्द संबंधित महिलांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. आपला मोबाईल सीबीआयकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात येत आहे, असे सांगितले.

त्यानंतर संदीप कुमार राव या इसमाने आपल्याशी संपर्क साधून आपण काही गैरव्यवहार केल्याचे आम्हाला तुमच्या व्यवहारातून दिसत आहे असे सांगितले. करण शर्मा या इसमाने आगरकर यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला काही बँकांमधून कमिशन मिळत आहे. तुम्ही गैरव्यवहार केला आहे हे स्पष्ट दिसते असे सांगून संदीप, करण शर्मा आगरकर यांना बोलवण्यात गुंतवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होते. सर्वोच्च न्यायालयाचे काही आदेश या इसमांनी तक्रारदाराला पाठविले.

तुम्हाला सात लाखापासून अधिकची रक्कम या आदेशाप्रमाणे भरावी लागेल. तुमच्या सारख्या अनेक केस आम्ही चालवित आहोत. आम्ही तुम्हाला या केसमधून व्यवस्थित बाहेर काढू त्यासाठी तक्रारदाराला सुरुवातीला सात लाख, नंतर नऊ लाख ५० हजार, ५४ लाख रूपये भरावे लागतील असे सांगितले. या रकमा आपणास परत मिळतील असे आश्वासन या इसमांनी तक्रारदाराला दिले.

इसमांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आगरकर यांनी इसमांच्या बँक खात्यावर ऑनलाईन माध्यमातून एकूण ७१ लाख १० हजार रूपये भरणा केले. या सर्व प्रकाराविषयी शंका आल्याने तक्रारदाराने घडत असलेला प्रकार आपल्या पत्नीला सांगितला. पत्नीने संबंधित इसमांना घडल्या प्रकाराविषयी विविध प्रकारचे प्रश्न केले. ते निरूत्तर झाले. या इसमांनी पाठविलेले कागदपत्र त्याची पडताळणी केल्यावर ते बनावट असल्याचे तक्रारदाराच्या पत्नीच्या लक्षात आले. आपली फसवणूक या इसमांनी केल्याचे निदर्शनास आले.

महेश आगरकर यांनी तातडीने ऑनलाईन माध्यमातून या फसवणुकीची तक्रार केली. टिळकनगर पोलीस ठाण्यात याविषयी प्राथमिक तपासणी अहवालाची नोंद केली. टिळकनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.