डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी मधील महिलांचा सायकल सखी ग्रुप हा सामाजिक, पर्यावरण, आरोग्य हे उद्दिष्ट ठेवून विविधांगी कार्यक्रम अनेक वर्ष राबवितो. दरवर्षी या ग्रुपच्या महिला आणि काही पुरुष मंडळी सायकलने पंढरपूर आषाढीवारी साठी जातात. या माध्यमातून हा गट पर्यावरण संवर्धन, आरोग्य सृदृढता असा संदेश आपल्या प्रवासात गावोगावी देतो. या सायकल सखी ग्रुपच्या महिलांना पंढरपूर आषाढीवारीचे वेध लागले आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रवासाचा सराव सुरू केला आहे. १ एप्रिल ते ३० जून असे तीन महिने दररोज ३० किलोमीटर सराव हा महिलांचा सायकल ग्रुप करत आहे.
याच ग्रुप मधील एक धाडसी सायकलपटू योगिता थोटांगे (४३) यांनी सरावासाठी कर्जत जवळील प्रती पंढरपूर ते आळंदी येथे रविवारी जाऊन येऊन सुमारे १२० किलोमीटर अंतर यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांच्या सोबत डोंबिवली येथील प्रशांत विसपुते (६२ ) होते. शिवाय याच दिवशी ठाणे, मुंबई येथील एमडीव्ही सायकलिस्ट ग्रुप हा ठाणे, ऐरोली येथून निघून प्रति पंढरपूर – आळंदी येथे आले होते. या प्रवासाविषयी यावेळी चर्चामंथन करण्यात आले.
एमडीव्ही ग्रुप मधील सायकलिंगचा प्रसार करणारे महेश दाभोळकर, परिचित उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल राईड रविवारी पहाटे पाच वाजता निघून एकूण सहा तास चाळीस मिनिटात जाऊन येऊन पूर्ण केली. याच ग्रुपमधील ७३ वर्षाचे अनिल सहस्त्रबुद्धे यानी त्यांच्या जिद्दीने आणि अनुभवाने सर्वांना प्रेरणा दिली.
योगिता थोटांगे यानी यापूर्वी पुणे सायक्लोथॉन, बोईसर ते जव्हार क्लासिक, मालेगाव सायकलिंग क्लब तर्फे तीस दिवसात ६०० किलोमीटर, खोपोली – रायगड १०८ किलोमीटअनेक सायकल स्पर्धेत भाग घेऊन एकूण पन्नासहुन अधिक पदके, स्मृतिचिन्ह मिळवली आहेत. कर्करोग मुलांच्या मदतीसाठी ८९९ किलोमीटरची कॅन्सर राईड ही त्यानी नुकतीच डिसेंबर- जानेवारीमध्ये पूर्ण केली आहे.
योगिता थोटांगे या डोंबिवली एमआयडीसी मधील सायकल सखी ग्रुपच्या क्रियाशील सभासद आहेत. आपला ब्युटीपार्लर व्यवसाय सांभाळून सायकलची आवड जोपासत आहेत. आणि सामाजिक कार्य करीत आहेत. याच सायकल सखी ग्रुपच्या संस्थापिका आणि अध्यक्षा सुवर्णा राणे, सभासद वर्षा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिला या सायकलिंग व फिटनेस राखण्याच्या उद्देशाने व त्याची आवड निर्माण व्हावी यासाठी कार्यरत आहेत.
