डोंबिवली : मुंबईतील ‘कच्छ डेव्हलमेंट ऑर्गनायझेशन’ने गोरगरीबांना घरे बांधून देण्यासाठी डोंबिवलीच्या २७ गावातील दावडी येथे २९ वर्षांपूर्वी ८१ गुंठ्यांचा भूखंड जमीन मालकांकडून विकसित कराराने दस्त नोंदणीकृत करून घेतला आहे. या जागेवर गरीबांसाठी घरे बांधण्याचे नियोजन सुरू असताना, सोनारपाडा गावातील काही भूमाफियांनी संस्थेच्या ताब्यातील जागेवर बेकायदा शेड उभारून ही जागा हडप करण्याची तयारी केली. या भव्य शेडवर कारवाई करण्याची मागणी कच्छ डेव्हलपमेंट संस्थेने कल्याण-डोंबिवली पालिकेच्या ‘ई’ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त तामखेडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून ही प्रशस्त शेड उभारणाऱ्या इसमाला नोटीस बजावली आहे.

कच्छ डेव्हलपमेंट संस्थेचे मुंबई मस्जिद येथे कार्यालय आहे. या संस्थेचे सदस्य तिलकचंद भाई यांनी पालिकेच्या ‘ई’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तामखेडे यांना दिलेल्या तक्रारीनुसार, कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील दावडी येथील सर्वे क्रमांक ५१-१ वरील ८१ गुंठे जमीन क्षेत्र जमीन मालक मदन कृष्णा ठाकुर आणि इतर चार मालकांकडून विकसित कराराने दस्त नोंदणीकृत कागदपत्रांनी ऑगस्ट १९९७ मध्ये घेतले आहे.

मे. कच्छ डेव्हलमेंट ही संस्था गरजू, गरीबांना घरे बांधून देण्याचे काम करते. संस्थेने आतापर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात अशाप्रकारे घरे आणि जैन मंदिरे उभारणीची कामे केली आहेत. गरीबांसाठी घरे उभारणीच्या कामासाठी दावडी येथील जमीन ठाकुर यांच्याकडून घेतली. या जमिनीचा ताबा मे. कच्छ डेव्हलपमेंट संस्थेकडे आहे.

संस्थेच्या कोणत्याही सदस्याला लेखी, तोंडी न विचारता काही स्थानिकांनी पक्के बांधकाम करून एक भव्य गोदामासारखी शेड उभारली आहे. यासंदर्भातची माहिती मिळताच आम्ही आमच्या दावडी येथील जागेवर आलो. हे बांधकाम कोण करत आहे याची माहिती न देता. आमच्या जागेवर बांधकाम सुरू ठेवले. आमचा ताबा असलेल्या जमिनीवर आमची परवानगी न घेता पक्के निवाऱ्याचे बांधकाम करणाऱ्या जागेची पाहणी करून संबंधित काम तातडीने थांबविण्याचे आदेश द्यावेत आणि ते तातडीने तोडून टाकावे, अशी मागणी संस्थेने पालिकेकडे केली आहे.

आयुक्तांकडे तक्रार करणार

सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे यांनी सांगितले की, पालिकेच्या ई प्रभागातील एका कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने ही शेड उभारण्यात आली आहे. अनेक वर्ष हा कर्मचारी ई प्रभागात ठाण मांडुन आहे. या कर्मचाऱ्याची आपण पालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत.

भूमाफियाला नोटीस

सहाय्यक आयुक्त तामखेडे यांनी सोनारपाडा येथील एका इसमाला या बांधकाम प्रकरणी नोटीस पाठवली. या बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारी सर्व कागदपत्रे घेऊन ५ ऑगस्ट रोजी ई प्रभाग कार्यालयात हजर राहण्यास कळवले आहे. आपण या दिवशी हजर राहिले नाहीत. कागदपत्रे सादर केली नाहीत तर ते बांधकाम अनधिकृत घोषित करून कारवाई केली जाईल, अशी तंबी पालिकेने दिली आहे.