डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागातील एका गृहसंकुलातील बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील ४० तोळे सोने आणि ५० हजार रूपयांची रोख रक्कम चोरून करून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. या घराचे मालक उत्तरप्रदेशातील आपल्या मूळ गावी आपल्या नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गेले होते त्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागातील आर.पी. रेसीडेन्सी गृहसंकुलात राहणारे अशिष रामधनी यादव हे आपल्या कुटुंबासह मूळ गावी उत्तरप्रदेश येथे लग्न समारंभासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराची चावी आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून त्यांची सोनारपाडा भागात राहणारी बहिण मायादेवी यांच्याकडे दिली होती. घर बंद राहणार असल्याने यादव कुटुंबीयांनी या कालावधीत पेस्ट कंट्रोलचे काम करून घेतले होते. ९ फेब्रुवारी रोजी यादव यांच्या घरात पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. त्यानंतर घर व्यवस्थित बंद करण्यात आले होते. त्यानंतर आठवड्याने मायादेवी व त्यांचे पती यादव यांच्या घरी वाॅटर फिल्टर दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ येणार असल्याने दुपारच्या वेळेत गेले होते. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घर व्यवस्थित बंद केले असताना मायादेवी आणि त्यांच्या पतीला घराचा संरक्षित बाहेरचा दरवाजा आणि आतील दरवाजा यांचा कडीकोयंडा, कुलुप तुटलेले दिसले. त्यांनी आत प्रवेश करून पाहणी केली असता दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी व आतील तिजोरीची दारे तोडलेली आढळली.
घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले होते. घटनेची माहिती तात्काळ अशिष यादव यांना देण्यात आली. प्राथमिक चौकशीत घरातील सुमारे ५० हजार रुपयांची रोकड तसेच अंदाजे ४० तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात कुटुंबीयांकडून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरातील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांकडून तपासले जात असून संभाव्य संशयितांचा शोध सुरू केला आहे. मात्र अलीकडील काळात डोंबिवलीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुट्टी किंवा लग्नसराईच्या काळात गावी जाणाऱ्या कुटुंबांच्या घरांवर चोरट्यांचा डोळा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी घर बंद ठेवताना अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना कराव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

