डोंबिवली : गेल्या काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील एका घरात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या एका महिला व पुरुष मध्यस्थाला पोलिसांनी अटक केली. ही घटना ताजी असताना अशीच दुसरी घटना आता उजेडात आली आहे. डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील ‘एजंल प्राईड’ या एका उच्चभ्रू वस्तीच्या संकुलात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिला, पुरुष मध्यस्थाविरुद्ध मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
योगिता रमाकांत वणगे (वय ५०) असे गुन्हा दाखल मध्यस्थाचे नाव आहे. साहिल संदीप पाटील (२४) हाही मध्यस्थ यातील मध्यस्थ आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे हवालदार ज्ञानेश्वर शिंदे यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती, अशी की पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना गुप्त माहिती मिळाली, की मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत डोंबिवली पूर्व देसलेपाडा हद्दीतील एका इमारतीत वेश्याव्यवसाय चालवित आहेत. ही माहिती उपायुक्त झेंडे यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलीस पथकाने तात्काळ छाप्याची तयारी केली.
वेश्याव्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी पोलिसांनी दोन महिला, पुरुष बनावट ग्राहक तयार केले. एका बनावट ग्राहकाने वेश्या चालविणाऱ्या महिला मध्यस्थाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तिने ग्राहकासाठी व्यवस्था पुरवण्याची तयारी दर्शवली. एका मुलीसाठी दोन हजार रूपये द्यावे लागतील, असे बनावट ग्राहकाला सांगितले. तिने आपले नाव योगिता व देसलेपाडा येथील ‘एजंल प्राइड’ सोसायटीतील सदनिका क्रमांक २१० मध्ये ही सोय आपणास उपलब्ध होईल, असे योगिता हिने बनावट ग्राहकाला सांगितले.
एंजल प्राइड सोसायटीत वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री पटल्यावर पोलीस निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण, हवालदार सुनील भणगे, आशा सूर्यवंशी, नितीन सांगळे व शिवाजी राठोड, पंच, बनावट ग्राहकासह गेल्या शुक्रवारी सायंकाळी देसलेपाडा येथे साध्या वेशात पोहोचले. बनावट ग्राहक मध्यस्थ योगिता हिने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. तेथे त्याची योगिताशी बोलणी झाली. त्यानंतर बनावट ग्राहक बनून आलेल्या व्यक्तींनी योगिताकडे पैसे सोपवले.
त्याच वेळी ठरल्याप्रमाणे सापळा रचून बसलेल्या पोलिसांना मोबाइलच्या माध्यमातून संपर्क करून येण्याचा इशारा केला. त्यानंतर पोलीस पथक इमारतीत पोहोचले. पथकाने सदनिकेची तपासणी केली. त्यावेळी चार मुली तेथे होत्या. त्यांना विक्रोळी, ऐरोली, दिवा व कल्याण कोळसेवाडी भागातून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी योगिता व संदीप या दोन्ही मध्यस्थांना ताब्यात घेतले. चार पीडित मुलींची या मध्यस्थांच्या ताब्यातून सुटका केली.
