डोंबिवली – डोंबिवली जवळील देसलेपाडा येथे भंगार वस्तू खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका भंगार विक्रेता आणि त्याच्या वडिलांना देसाई गावातील तीन जणांनी लाकडी दांडक्यांनी रविवारी बेदम मारहाण केली. या मारहाणीत वडील, मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी भंगार विक्रेत्याने तक्रार केली आहे. हा मारहाणीचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सागर कोटकर असे मारहाण करणाऱ्या देसाई गावातील इसमाचे नाव आहे. त्याच्या दोन साथीदारांची नावे भंगार विक्रेत्याला समजली नाहीत. या तीन इसमांविरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पंकज मोर्या (१९) असे तक्रारदार भंगार विक्रेत्याचे नाव आहे. पंकज हा सागाव खालचापाडा येथे कुटुंबीयांसह राहतो. त्याच्या वडिलांचा सोनारपाडा येथे भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पंकज देसलेपाडा येथे भंगाराचा व्यवसाय करतो.

पंकज मोर्या यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान आपण दुकानातील अनेक दिवसांचे भंगार पोत्यांमध्ये भरून विक्रीसाठी बाहेर काढले होते. हे सामान एका टेम्पोतून नेले जाणार होते. भंगार सामानाची पोती आपण टेम्पोत सहज चढविता यावीत म्हणून रस्त्याच्याकडेला ठेवली होती. त्यावेळी तेथे आपला परिचित सागर कोटकर आला. त्याने मला दुकानाच्या बाहेर भंगार का ठेवले आहे, असे प्रश्न केले. मी त्याला भंगार नेण्यासाठी टेम्पो येत आहे. ते लगेच उचलले जाणार आहे, असे सांगितले.

त्यावेळी त्याने माझे काहीही न ऐकता मला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. मी त्याला तु मला का मारले म्हणून विचारले, तर त्याने मला धक्का देऊन जमिनीवर पाडले आणि स्वता निघून गेला. ही माहिती समजताच माझे वडील सोनारपाडा येथून देसलेपाडा येथे आले. मी सागरला शोधायला भोपर भागात गेलो. त्यावेळी सागर कोटकर आपल्या दोन साथीदारांना घेऊन माझ्या देसलेपाडा येथील दुकानावर आला. त्याने वडिलांशी हुज्जत घालून त्यांना दुकानातील दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. तुम्हा लोकांना खूप चरबी आली आहे, असे बोलत त्याने ही मारहाण केली, असे पंकज मौर्या यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.

हप्ता मागण्यासाठी ही मारहाण केली असल्याची चर्चा परिसरात आहे. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील भंगार विक्रेते, वाहन दुरूस्ती कार्यशाळा मालक, काही दुकानदार, टपरी चालक यांच्याकडून अनेक स्थानिक गावगुंड दरमहा हप्ते घेत असल्याची चर्चा आहे.