डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील खाडी किनारी सकाळी फिरण्यासाठी गेलेले ज्येष्ठ नागरिक सुगंध म्हात्रे यांच्यावर हल्ला करून त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची १ लाख रूपयांची सोन्याची साखळी चोरून नेण्याच्या प्रकरणात विष्णुनगर पोलिसांनी एकूण ९ जणांना अटक केली आहे. यामध्ये बड्या धनवानांच्या घरातील तीन मुले, सहा अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. या प्रकरणातील मूळ आरोपी हा अल्पवयीन असून, तो एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे, अशी माहिती डोंबिवली विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.
अटक आरोपींमधील एकावर ३, एकावर २ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात दोन जण सख्खे भाऊ आहेत. गुन्हेगार पार्श्वभूमीच्या आणि खुनाच्या गुन्ह्यातून नुकताच बाहेर आलेल्या एका सराईत अल्पवयीन मुलाने सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लुटण्याची योजना तयार केली. एक ते दोन दिवस देवीचापाडा भागात सकाळच्या वेळेत कोण फिरण्यासाठी येते याची पडताळणी करून मग सुगंध म्हात्रे यांच्यावर गेल्या आठवड्यात पहाटेच्या वेळेत हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज आरोपींनी लुटून नेला होता.
आरोपींची नावे
चिंतन सुनील नंदा (२०, रा. सागर हाईट्स, पाचवा माळा, वेताळनगर, डोंबिवली पश्चिम, मोहित सुनील जाधव (१९, रा. श्री समर्थ कृपा, खोली क्रमांक ४०४, सत्यवान चौक, डोंबिवली पश्चिम, स्वप्निल सुनील भोईर (२७, रा. स्वप्नाचे घर, मोठागाव, रेतीबंदर छेद रस्ता, डोंबिवली पश्चिम अशी अटक करण्यात आलेल्या बड्या घरातील धनवान कुटु्ंबातील मुलांची नावे आहेत. ६ अल्पवयीन मुलांना भिवंडी येथील बालसुधार गृहात तपासासाठी पाठवून देण्यात आले आहे. यामधील एका अल्पवयीन मुलाने काही महिन्यपूर्वी एका तरूणावर हल्ला केला होता. तो तुरूंगात होता. आता बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या होत्या.
गेल्या आठवड्यात गुन्हा घडल्यानंतर देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर, बाळा म्हात्रे, नरेश म्हात्रे, राम म्हात्रे, रमेश पदु म्हात्रे, हरिश्चंद्र पाटील आणि ग्रामस्थांनी एक बैठक घेऊन याप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करणे आणि देवीचापाडा भागातील गस्त वाढविण्याची मागणी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांच्याकडे केली होती.
तातडीने तपास
देवीचापाडा येथे सुगंध म्हात्रे यांच्यावरील हल्ला आणि त्यांचा ऐवज चोरून नेल्या प्रकरणाचा विष्णुनगर पोलिसांनी तातडीने तपास केला. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपींना साखळी पध्दतीने अटक केली. सुगंध म्हात्रे यांची सोन्याची साखळी दिवा येथील सराफाला विक्री करण्यासाठी आरोपी स्वप्निल भोईर याने महत्वाची भूमिका बजावली, असे हेमाडे यांनी सांगितले. या गुन्ह्यात बड्या घरातील तीन मुले, दोन सख्खे भाऊ आढळले आहेत. आपली अंमली पदार्थ, चटपटीत खाण्याची हौस पूर्ण करण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र चोपडे, पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे, हवालदार पाटील, निकुळे, फड, कसबे, रायसिंग, देसले, बोडके, भाबड सहभागी झाले होते.
नागरिकांनी फिरण्यासाठी बाहेर पडताना अंगावर महागडे अलंकार ठेऊ नयेत. उजाडल्यानंतर सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडावे, फिरण्यासाठी कुटुंबातील सदस्य सोबत ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
