डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा भागातील रेतीबंदर चौक ते गावमंदिर दरम्यानच्या रस्त्यावर रस्ता आणि पदपथ अडवून भूमाफियांनी उभारलेले १५ बेकायदा गाळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाच्या नियंत्रण पथकाने साहाय्यक आयुक्त अभिमान पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी खननयंत्राच्या साहाय्याने भुईसपाट केले.
या कारवाईच्यावेळी कोणीही भूमाफिया
पालिकेची कारवाई रोखण्यासाठी पुढे आला नाही. गेल्या दोन महिन्यापासून देवीचापाडा भागातील काही भूमाफिया येथील वर्दळीच्या रस्त्यावरील रस्ता आणि पदपथ अडवून कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पध्दतीने पत्रे, बांबू, हिरव्या जाळ्या यांचा वापर करून कच्चे गाळे उभारणीचे काम करत होते. गावदेवी सोसायटी आणि पार्वती पुण्याई बंगल्या समोरील सार्वजनिक रस्त्यांवर हे गाळे उभारणीचे काम केले जात होते. या गाळ्यांच्या ठिकाणी नंतर वीट, दगडीचे पक्के बांधकाम करून ही रस्त्यालगतची जागा हडप करण्याचा भूमाफियांचा डाव होता. रात्री बारा वाजल्यानंतर भूमाफिया हे पक्के गाळे उभारणीचे काम करायचे, असे स्थानिक रहिवासी सांगतात.
पालिकेकडून पाळत
गेल्या महिन्यापासून हे बेकायदा गाळे उभारणीचे काम सुरू झाल्यानंतर मोक्याची जागा भूमाफिया हडप करतील आणि वाहतुकीला अडथळा आणतील या विचाराने काही स्थानिक रहिवासी, भाजपेच स्थानिक नगरसेवक दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांसह, ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त अभिमान पवार यांना संपर्क करून देवीचापाडा भागात दिल्ली ते जेएनपीटी (उरण) समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्गाजवळ जे बेकायदा गाळे उभारले जात आहेत ते तातडीने तोडण्याची मागणी केली. गाळे उभारणीची जागा मालकी हक्काची किंवा अन्य कोणा मालकीची आहे याची खात्री करण्यासाठी साहाय्यक आयुक्त पवार गेल्या महिन्यापासून देवीचापाडा भागात हे बेकायदा गाळे उभारणाऱ्या माफियांचा शोध घेत होते. कोणीही त्यांना माफियांची माहिती देत नव्हते.
नोटिसीद्वारे इशारा
एकीकडे भूमाफियांचा शोध लागत नाही.आणि दुसरीकडे पत्रे ठोकुन, बांबू उभारून गाळे उभारणीची कामे मात्र जोरात सुरू होती. ही गाळे उभारणीची कामे पूर्ण झाली की या बेकायदा गाळ्यांलगतच्या मोकळ्या जागेतही इतर भूमाफिया गाळे उभारून रस्त्यात अडथळा आणि पदपथ बंद करून टाकण्याची शक्यता होती. साहाय्यक आयुक्त अभिमान पवार यांनी पत्रे लावून उभारलेल्या गाळ्यांना शुक्रवारी २४ तासाची मुदत देऊन गाळे बांधणाऱ्या धारकाने तातडीने जमिनीची, बांधकाम परवानगीची कागदपत्रे घेऊन पालिका ह प्रभाग कार्यालयात हजर राहण्याची नोटीस पत्र्यांच्या गाळ्यांना चिकटवली. ती नोटीस रात्रीतून भूमाफियांनी फाडून टाकली.
२४ तासाची मुदत देऊनही भूमाफिया पालिकेत सुनावणीला हजर राहिला नाही. त्यामुळे शनिवारी दुपारी साहाय्यक आयुक्त पवार आणि अतिक्रमण नियंत्रण पथकाने देवीचापाडा भागातील रस्त्यालगतचे गाळे खननयंत्राच्या (जेसीबी) साहाय्याने जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
या रस्त्यालगतची जागा रेल्वेने आपल्या प्रकल्पासाठी गेल्या सहा वर्षापूर्वी संपादित केली. त्याचा मोबदला मालमत्ता, जमीन मालकांना दिला. तरीही काही जमीन मालक पुन्हा रेल्वेने मोबदला दिलेल्या जागेत आपला हक्क दाखवून तेथे बांधकामे करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
देवीचापाडा भागात रस्ता, पदपथ अडवून गाळे उभारणाऱ्या इसमाचा आम्ही शोध घेत होतो. दोन दिवसापूर्वी गाळ्यांच्या ठिकाणी नोटीस बजावून इसमाला आवश्यक कागदपत्रासह पालिकेत हजर राहण्याचे कळवले होते. मुदत संपुनही बांधकामधारक पालिकेत हजर झाला नाही. त्यामुळे ते बेकायदा गाळे जमीनदोस्त कण्यात आले. तेथे पुन्हा गाळे उभारले तर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.- अभिमान पवार साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग. डोंबिवली.
