डोंबिवली : डोंबिवली पश्चिम देवीचापाडा गोपीनाथ चौक ते जगदंबा माता मंदिर परीसरात सिमेंट काँक्रीटच्या ४० फुटी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ठेकेदाराने सुरू केले आहे. खनन यंत्राने (जेसीबी) गोपीनाथ चौक भागातील रस्त्याची खोदाई करताना बुधवारी सकाळी ११ वाजता जमिनीखाली असलेली महावितरणची वीज वाहिनी तोडली गेली. यामुळे गोपीनाथ परिसराचा वीज पुरवठा तीन तास ठप्प खंडित झाला होता.

एमएमआरडीएने शहराच्या विविध भागात कामे करताना जागोजागीच्या भूमिगत वीज वाहिन्या खनन यंत्राच्या साहाय्याने तोडून टाकल्याने महावितरण कर्मचारी, अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. पावसाळ्यात ही कामे करताना महावितरण कर्मचाऱ्यांची दमछाक झाली होती. गोपीनाथ चौक ते जगदंबा माता मंदिर रस्त्याच्या काँक्रिटीची करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम एमएमआरडीएने सुरू केले आहे. या कामासाठी गोपीनाथ चौकातून रस्त्याच्या तळाचा पृष्ठभाग खडी, रोलरने सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे.

हे काम करण्यापूर्वी खनन यंत्राने रस्त्याच्या कडेचा भाग खोदत असताना लक्ष्मी नारायण कृपा सोसायटी आणि परिसराकडे जाणारी भूमिगत वीज वाहिनी बुधवारी सकाळी ११ वाजता तोडली. त्यामुळे परिसराचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. ही माहिती महावितरणच्या रेतीबंदर भागातील साहाय्यक अभियंता तुषार सातकर यांना समजताच त्यांनी तातडीने नादुरुस्त झालेली वीज वाहिनी सुस्थितीत करण्यासाठी दुरुस्ती पथक घटनास्थळी पाठविले. हे काम भूमिगत आणि अवघड असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी (जाईन्डर) हे काम पूर्ण केले. तोपर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले.

चार महिने काम सुरू राहणार

या रस्त्याचे काम करताना खोदाई सुरू असताना काळजीपूर्वक करावी, अशा सूचना एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी रस्ते ठेकेदारा, खनन यंत्र, रोलर यंत्र चालकाला द्याव्यात, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. येणारे तीन ते चार महिेने हे रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू राहणार असल्याने परिसरातील रहिवाशांच्या ठेकेदाराने, एमएमआरडीए अभियंत्यांनी विचार करावा, अशी मागणी रहिवाशांची आहे.