डोंबिवली – पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी बेदम मारहाण केल्याच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. लोकशाहीतील या ठोकशाहीचा कायमचा बिमोड करण्यासाठी आणि याप्रकरणी राज्य, केंद्र शासनाने कठोर भूमिका घेऊन दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशच्या महाराष्ट्र शाखेने तातडीच्या एका आपत्कालीन बैठकीचे १६ जुलै रोजी ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीत डाॅक्टर मारहाण प्रकरणाचा निषेध करण्यासाठी देशव्यापी आरोग्य सेवा बंद करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे समजते. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डाॅ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डाॅ. विक्रांत देसाई, राज्य खजिनदार डाॅ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या बैठकीत देशाच्या विविध राज्यांमधील ‘आयएमए’चे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. सृष्टी बाविस्कर, डाॅ. वैभव साळुंके यांना नगरसेवक रमेश म्हात्रे मारहाण, शिवीगाळ करत असतानाच्या दृश्यध्वनी चित्रफिती पाहून राज्यभरातील डाॅक्टर, परिरचारिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काश्मिर ते कन्यापुरीपर्यंतच्या ‘आयएमए’च्या सदस्य डाॅक्टरांनी ‘आयएमए’ महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करून हा विषय केवळ निषेधापुरता मर्यादित न ठेवता लोकशाहीतील या ठोकशाहीचा कायमचा बिमोड झाला पाहिजे.
या गंभीर विषयाकडे राज्य, केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याच्या दृष्टीने हालचाली झाल्या पाहिजेत, असे सूचित केले आहे. त्यामुळे डोंबिवलीतील डाॅक्टर मारहाण प्रकरणावर विचार विनीमय करण्यासाठी १६ जुलै रोजी ‘आयएमए’ची आपत्कालीन बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे ज्येष्ठ डाॅ. मंगेश पाटे यांनी सांगितले. कुटुंब सांभाळुन डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी समर्पित भावाने रुग्ण सेवा देत असतात. रुग्ण सेवा देताना विविध प्रकारच्या तणावाच्या परिस्थितीला डाॅक्टर, परिचारिकांना सामोरे जावे लागते.
अशा परिस्थितीत डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिकेतचा विचार न करता, ते कोणत्या परिस्थितीत रुग्ण सेवा देतात याचा विचार न करता कोणीही लोकप्रतिनिधी येऊन शासकीय, पालिका रुग्णालयातील डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करत असेल तर हा हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. हे कृत्य करणाऱ्यांना योग्य कठोर शिक्षा झाली पाहिजे, असा विचार या बैठकीत करण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवलीतील डाॅक्टरांना मारहाण प्रकरण शिंदे शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना जड जाण्याची चिन्हे आहेत. राजकीय आशीर्वादामुळे आरोपी असुनही म्हात्रेंचे शासकीय यंत्रणांकडून लाड सुरू असल्याने खासगी, सरकारी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कर्तव्यावर असताना रुग्णालयात घुसून डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. डोंबिवलीतील डाॅक्टर मारहाण प्रकरणाविषयी देशभरातील डाॅक्टर आक्रमक आहेत. या प्रकाराविषयी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईसाठी तक्रारी करण्यात आल्या आहेत. डाॅ. मंगेश पाटे ज्येष्ठ डाॅक्टर, डोंबिवली.
