डोंबिवली : माल वाहतूक करणाऱ्या भिवंडीतील एका टेम्पो चालकाने डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगरमधील टपाल कार्यालयाजवळ सकाळच्या वेळेत एका श्वानाच्या पिल्लाला चाकाखाली चिरडले. या टेम्पो चालकाने पिल्लाला डाॅक्टरकडे नेणे वा त्याची शुश्रूषा करण्याऐवजी त्या ठिकाणाहून पळ काढला. परंतु, वस्तू वितरक असलेल्या एका प्राणीप्रेमीने या टेम्पो चालकाचा वाहन क्रमांक, त्याचे नाव शोधून त्याच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी प्राणी प्रतिबंधित छळ कायद्याने चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपेश भोईर असे टेम्पो चालकाचे नाव आहे. तो भिवंडी येथील रहिवासी आहे. लॅम्युअल अम्मन असे तक्रारदाराचे नाव आहे. ते वस्तू वितरक आहेत. अम्मन यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण एका खासगी कंपनीत वस्तू वितरकाचे काम करतो. जुनी डोंबिवलीत कुटुंबीयांसह राहतो. दिवसभर याठिकाणी आपण काम करतो. उमेश नगरमधील विष्णुनगर टपाल कार्यालयाजवळील कंपनीच्या साठवण केंद्रात आपले कार्यालय आहे. या साठवण केंद्राजवळ एक मादी श्वान व तिचे लहान पिल्लू आहे. आपण स्वत:, आपला मित्र या दोन्ही श्वानांची काळजी घेतो. त्यांना दररोज खाण्यास देणे. आजारी असेल तर प्राण्यांच्या डाॅक्टरकडे नेणे अशी कामे करतो.

खासगी कंपनीचा माल ज्याठिकाणी उतरतो. तेथे काही दिवसापूर्वी पहाटेच्या वेळेत दुधाच्या पिशव्या घेऊन एक टेम्पो आला. त्याने दुधाच्या पिशव्या उतरविण्यात आल्या. तेथून निघत असताना टेम्पो चालक दीपेश भोईर यांनी त्या भागात खेळत असलेल्या मादी श्वानाचे ४५ दिवसांचे पिल्लू टेम्पोच्या चाकाखाली आले. त्यात ते गंभीर जखमी झाले. आपले मित्र विपुल, मोजस यांनी टेम्पो चालकला घडल्या घटनेची माहिती दिली. त्याला आहे तेथेच थांबण्यास सांगितले. पण तो घाईत तेथून निघून गेला. आपण कामावर आलो. त्यावेळी आपणास आपल्या मित्रांनी श्वानाच्या पिल्लाबाबत घडलेला प्रकार सांगितला.

आपण तात्काळ खासगी कंपनीच्या एजन्सीतील कागदपत्रावरून त्या टेम्पोचा वाहन क्रमांक मिळवला. त्या क्रमांकावरून चालकाचे नाव शोधून काढले. पिल्लू खूप जखमी झाल्याने ते अस्वस्थ असल्याने आपण आपल्या मित्रांनी त्याला घाटकोपर राजावाडी येथील प्राण्यांच्या डाॅक्टरकडे नेले. तेथे डाॅक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. पण अतिशय अस्वस्थ असल्याने उपचार सुरू असताना प्राण्याने प्राण सोडले. आपला मित्र अमित शहा यांनी राजावाडी स्माशानभूमीत त्याला दफन करण्यात आले. टेम्पो चालकाच्या चाकाखाली येऊन पिल्लू गंभीर जखमी होऊन मरण पावल्याने आपण ही तक्रार करत आहोत, असे अम्मन यांनी तक्रारीत म्हटले आहे.