डोंबिवली – सामाजिक सेवा, आरोग्य जनजागृतीच्या उपक्रमांमधून मागील ५० वर्ष वैद्यकीय व्यवसाय करणारे ज्येष्ठ डाॅ. अरूण पाटील यांनी आपले डोंबिवली पूर्व रामनगर भागातील राजाजी पथावरील आपले संजिवनी रूग्णालय बंद करत असल्याची घोषणा केली आहे. संजिवनी रुग्णालयाशी संबंधित रुग्णांनी यापुढे तपासणीसाठी डोंबिवली पूर्व भागातील वाहतूक कार्यालयासमोरील श्री स्वामी समर्थ मंदिर पाॅलिक्लिनिक, एमआयडीसीतील आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट येथे विहित वेळेत तपासणीसाठी यावे असे आवाहन डाॅ. पाटील यांनी केले आहे.
मागील पन्नास वर्ष डाॅ. अरूण पाटील आरोग्य जनजागृतीचे विविध उपक्रम, आदिवासी, दुर्गम भागातील नागरिकांचे सुदृढ आरोग्य, आरोग्यविषय जनजागृती या भावनेतून वैद्यकीय सेवा करत आहेत. चालाल तर वाचाल या त्यांच्या चळवळीचा अनेकांनी आदर्श घेतला. या चळवळीचे महत्व पटविण्यासाठी डाॅ. अरूण पाटील यांनी स्वता दूरवरच्या चालण्याच्या मोहिमा आखल्या. या मोहिमांच्या माध्यमातून शहर, गाव, खेडी, आदिवासी पाड्यांतील नागरिकांना डाॅ. पाटील यांनी चालण्याचे महत्व पटवून दिले.
आश्रय चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबवून आश्रय ट्रस्टची विविध समाज घटकांशी जुळणी केली. या ट्रस्टचे सुसज्ज अद्ययावत रुग्णालय उभे करण्यात डाॅ. पाटील यांच्यासह समर्पित भावनेच्या साथीदारांचा मोलाचा वाटा आहे. आता पन्नास वर्ष संजिवनी रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा केल्यानंतर हळूहळू वेगळी पायवाट म्हणून डाॅक्टरांनी हे रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या रुग्णालयाशी संबंधित रुग्णांसाठी आता डोंबिवली एमआयडीसीतील आश्रय ट्रस्टचे रुग्णालय आठवडाभर चोवीस उपलब्ध असणार आहे. संजिवनी रुग्णालयाशी आणि इतर आजाराच्या रुग्णांशी यापुढे तपासणीसाठी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रामनगर वाहतूक पोलीस कार्यालयासमोरील श्री स्वामी समर्थ मंदिर पाॅलिक्लिनिकमध्ये मंगळवार आणि गुरूवारी सकाळी साडे आठ ते सकाळी १० या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन डाॅ. पाटील यांनी केले आहे.
सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी साडे आठ ते सकाळी ११ वेळेत रुग्णांनी तपासणीसाठी डोंबिवली एमआयडीसीतीलआश्रय चॅरिटेबल रुग्णालयात (अभिनव बँकेजवळ) यावे. या दोन्ही ठिकाणी धर्मादाय दराने रुग्ण शुल्क आकारले जाणार आहे. रुग्ण दाखल, शस्त्रक्रिया, रुग्णांचे नियमितचे ड्रेसिंग या सर्व प्रक्रिया आश्रय रुग्णालयात होणार आहेत. सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या आश्रय रुग्णालयात होणार आहेत. दोन विशेष तज्ज्ञ निवासी डाॅक्टर या रुग्णालयात चोवीस तास उपलब्ध असणार आहेत, असे डाॅ. अरूण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. समाजातील सेवाकार्य करणाऱ्या विविध घटकांना आपल्या आई. वडिलांच्या नावे देण्यात येणाऱ्या पुरस्काराने त्यांनी अनेक वर्ष सन्मानित केले.

