कल्याण – शरीर सुख, विनयभंग प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिका २७ गाव ई प्रभागातील लिपीक भूषण बळीराम पाटील यांना गुरुवारी पालिका सेवेतून निलंबित केले. या प्रकरणातील तक्रारदार महिलेचीही ई प्रभागातून अन्य प्रभागात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा व शिस्त अपील नियम १९७९ मधील तरतुदीनुसार आयुक्तांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. पाटील हे पालिकेच्या २७ गाव हद्दीतील ई प्रभागात लिपीक म्हणून कार्यरत होते. ते अस्थायी ठोकवेतनावर काम करत होते. गेल्या पाच दिवसापूर्वी पाटील यांच्या विरूध्द याच प्रभागाील एका महिला कर्मचाऱ्याने त्यांच्या विरूध्द अश्लीलतेचे आरोप करत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता.
‘आपल्या विरूध्द दाखल करण्यात आलेली तक्रार सूडबुध्दीने आपली बदनामी करण्यासाठी केली आहे. आपल्यावरील हे सर्व आरोप खोटे आहेत,’ असे पाटील यांनी सांगितले होते. याप्रकरणी आपल्या वकिलामार्फत पोलिसांना माहिती दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. पालिका प्रशासनाकडेही त्यांनी आपली बाजू मांडली होती.
आयुक्तांपर्यंत हा विषय गेल्याने आयुक्तांनी हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा अश्लीलतेशी संबंधित आहे. या गुन्ह्यासंदर्भातच्या बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेची समाज माध्यमांतील प्रतिमा मलीन झाली. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता प्रशासनाच्या प्रतिमेवर आणि सेवाशिस्तीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. पाटील यांच्या विरूध्दच्या गुन्ह्याच्या सखोल, निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी याप्रकरणातील कोणताही पुरावा त्यांच्याकडून नष्ट होऊ नये, साक्षीदारांवर दबाव येऊ नये यासाठी त्यांना पालिका सेवेत ठेवणे हितावह नाही, असे आयुक्त गोयल यांनी निलंबन आदेशात म्हटले आहे.
निलंबन काळात ते पालिका मुख्यालयात असतील. वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आयुक्तांनी पत्रात सूचित केले आहे. पाटील यापूर्वी पालिकेतील एका वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक जाळ्यात अडकला त्या प्रकरणात सहभागी होते. त्यावेळीही त्यांना प्रशासनाने निलंबित केले होते. त्यानंतर निलंबन आढावा समितीने त्यांना पुन्हा कामावर घेतले होते. मानपाडा पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
पालिका प्रशासनात अनेक कर्मचारी प्रत्यक्ष प्रशासकीय कामापेक्षा इतर उद्योगांत सर्वाधिक व्यस्त असल्याचे पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येत असल्याने या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांना उचलबांगडी, निलंबन करण्याचा धडाका लावला आहे.
आयुक्त गोयल यांनी डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागातील अतिक्रमण नियंत्रण पथक, फेरीवाला हटाव पथक आणि या प्रभागातील नियंत्रक अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी डोंबिवली पश्चिमेतील विविध स्तरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. डोंबिवली पश्चिमेतील बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी अनेक तक्रारी येऊनही या प्रभागातील तोडकाम पथक, अधिकारी त्याची दखल घेत नाहीत. या प्रभागात फेरीवाला हटाव पथकात काही कर्मचारी राजकीय आशीर्वादाने १५ वर्षापासून ठाण मांडून आहेत. या प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक जागरूक नागरिक मुंबईत आझाद मैदान येथे आयुक्त, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या विरूध्द बेमुदत उपोषणाला बसला आहे.
