डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील एका इमारतीत मधील आस्थापनेत सोमवारी सकाळी अचानक आग लागली. आगीने क्षणार्धात उग्ररूप धारण केले. आगीचे लोळ आणि धूर इमारतीच्या गच्चीवर जाताच, गच्चीवर झोपलेले कामगार गच्चीच्या कठड्याचा आधार घेत रेल्वे मार्ग भागाकडील इमारतीच्या निवाऱ्याचा आधार घेऊन बाहेर पडले.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भाग हा सर्वाधिक वर्दळीचा आणि रेल्वे मार्ग असलेला भाग आहे. या भागात रेल्वेचे उदवाहन आणि स्कायवाॅक, प्रवासी जिना आहे. या जिन्याच्या बाजुला एक लस्सीचे दुकान आहे. लस्सी दुकानालगत असलेल्या एक आस्थापनेत सोमवारी सकाळी अचानक आग लागली. सकाळची वेळ असल्याने बहुतांशी कामगार झोपले होते. काही जण उठून आवश्यक प्रक्रिया पार पाडत होते.

यावेळी तळ मजल्यावरून अचानक धुराचे लोट इमारतीच्या गच्चीवर येऊ लागले. गरम झळा इमारतीच्या गच्चीच्या दिशेने येऊ लागल्या. अचानक धुराचे लोट गच्चीवर येऊ लागल्याने गच्चीवर झोपलेले आठ ते दहा कामगार झटपट गच्चीला लावलेले जाळ्याचे अडथळे दूर करून पाठोपाठ इमारतीच्या रेल्वे मार्गाकडील भागातील निवाऱ्यावर उतरले. एक जण घाबरलेला असल्याने त्याने रेल्वेच्या वाहिन्या आधाराचा खांबाचा आधार घेऊन त्याद्वारे जमिनीवर उतरणे पसंत केले.

आग लागल्याचे समजताच डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी आग म्हणून मोठ्याने ओरडा करून तेथील कामगार, ग्राहकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. लस्सी दुकानाजवळील इमारतीलगतच्या एका आस्थापनेत आग लागल्याचे समजताच काही जागरूक नागरिकांनी तात्काळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले. तोपर्यंत या आस्थापनेतील काही कामगारांनी आग विझविण्याचे दुकानातील साधन वापरून आगीवर नियंत्रण मिळवले. तर काही कामगारांनी पाण्याच्या बादल्या लागलेल्या आगीवर ओतल्या. एकावेळी चार ते पाच कामगार आग विझवू लागल्याने आटोक्यात असलेली आग दुकानातील आग विझविण्याच्या साधनाने विझली. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.

जवान आल्यानंतर त्यांनी आस्थापनेत जाऊन पाहणी केली. तोपर्यंत आग पू्र्ण विझली असल्याचे दिसले. त्यामुळे अग्निशमन विभागाचे जवान आग विझल्याची खात्री करून पुन्हा परत केले.

आग कशामुळे लागली याचा उलगडा झाला नाही. यासंदर्भातच्या चौकशीतून हा विषय पुढे येईल. अग्निशमन जवानांनी आम्ही जाईपर्यंत आग विझली होती. एका लस्सीच्या दुकानाच्या बाजुला असलेल्या आस्थापनेत ही आग लागली होती. रात्र पाळीचे कामगार निघून गेल्यावर दिवसपाळीचे काम सुरू होण्याच्या वेळेत ही आग लागली होती, असे जवानान सांगितले.