डोंबिवली : डोंबिवली पूर्व ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या पोहच रस्त्यावर स. वा. जोशी शाळेजवळ रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना याठिकाणाहून वाहने चालविताना कसरत करावी लागते. याच ठिकाणी पाण्याची एक भूमिगत जलवाहिनी फुटली आहे. या भागाता रस्ता मध्यभागी एक रस्ता रोधक उभा केला आहे. पुलावरून धावणाऱ्या वाहनांना खड्डे आणि रोधकचा अडथळा येत आहे.
ठाकुर्ली उड्डाण पूल पूर्व भागात स. वा. जोशी शाळा येथे पोहच रस्त्यावर गेल्या आठवड्यापासून खड्डे पडले आहेत. पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना कसरत आणि प्रवाशांची हैराणी होत आहे. ठाकुर्ली पूर्व उड्डाण पूल भागात डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडून येणारी, व्ही. पी. रस्ता, ठाकुर्ली चोळे, ९० फुटी रस्ता भागातून वाहने येतात आणि डोंबिवली पश्चिमेतील वाहने याच तिन्ही रस्त्यांवरून धावतात. त्यामुळे खड्डे झालेल्या भागात वाहन चालक संथगतीने वाहन चालवत असल्याने या भागात कोंडी होते. हे खड्डे भरण्याची सूचना वाहतूक विभागाने पालिकेला केली आहे.
शाळेच्या बस या रस्त्यांवरून धावतात. त्यांना या खड्ड्यांचा फटका बसतो. ठाकुर्ली चोळे भागातून कल्याण दिशेकडून येणारी वाहने ठाकुर्ली पुलावर जाण्यासाठी वळण घेतात. त्यावेळीही वाहन चालकांना कसरत करावी लागते. मोठी वाहने याठिकाणी खड्ड्यांमुळे तात्काळ वळण घेत नाहीत. त्यामुळे या वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांचा रांगा लागतात. पाऊस थांबून पडत असल्याने विश्रांती घेतल्याच्या काळात ठेकेदाराने ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळील खड्डे भरणीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहेत. माणकोली पुलाकडे धावणारी बहुतांशी वाहने याच रस्त्याने धावतात.शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. या खड्ड्यांमध्ये सतत वाहने आपटून खड्डे मोठे होण्यापेक्षा ते लवकर बुजविण्याची मागणी नागरिक करत आहेत.
प्रभागांमध्ये रस्त्यांप्रमाणे खड्डे भरण्यासाठी एजन्सी नियुक्ती केली आहे. खड्डे तात्काळ भरण्याच्या सूचना ठेकेदारांना केल्या आहेत. ठाकुर्ली येथील खड्डे भरण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्या आहेत. खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. खड्ड्यांविषयी नागरिकांच्या तक्रारी आल्या तर त्यांचीही दखल घेतली जात आहे. मनोज सांगळे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, डोंबिवली.