कल्याण – डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंंद भागात एका शेतकऱ्याला आपण तुमच्या जागेवर सर्व प्राधिकरण, विभागांच्या बांधकाम परवानग्या घेऊन सिध्दार्थ सृष्टी अधिकृत इमारत उभारू असे आश्वासन विकासकाने दिले. या इमारतीमधील बांधिव ५० टक्के हिस्सा विना मोबदला देण्याचे कबुल केले. त्यानंतर विकासकाने कोणत्याही प्राधिकरण, विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता शेतकऱ्याच्या जमिनीवर बेकायदा इमारतीची उभारणी केली. या इमारतीमधील सदनिका शेतकऱ्याला देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी शेतकऱ्याने कल्याण न्यायालयात विकासक, वास्तुविशारद यांच्या विरूध्द दावा दाखल केला होता.
न्यायालयाने या बेकायदा इमारतीची उभारणी करणारे विकासक मे. ओम कन्स्ट्रक्शनचे मालक अलोक सिंह, वास्तुविशारद आर. ए. सावंत यांच्या विरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी या दोघांविरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात नांदिवलीतील शेतकरी नारायण शंकर म्हात्रे (७०) यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेने फसवणूक, भारतीय न्याय संहितेने ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस ठाण्यातील माहिती अशी, की नारायण म्हात्रे आणि त्यांच्या वारसांची नांदिवली येथे सर्वे क्र. १७ हिस्सा क्र. ९ मध्ये ३५ गुंठे जमीन आहे. ही जमीन सन २०१७ मध्ये म्हात्रे कुटुंबीयांनी विकासक अलोक सिंह यांना दस्त नोंदणीकृत करारनामा करून अधिकृत इमारत उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेतला. या इमारतीमधील ५० टक्के बांधीव क्षेत्र विकासकाने म्हात्रे कुटुंंबीयांना विना मोबदला देण्याचे कबुल केले. सर्व प्राधिकरण, विभागांच्या बांधकाम परवानग्या घेऊन आपण इमारत उभारत आहोत. २४ महिन्यात हे काम पूर्ण होईल, असे आश्वासन विकासकाने म्हात्रे यांना दिले, असे विकासक सिंह यांनी नारायण म्हात्रे यांना भासवले.
म्हात्रे कुटुंबीयांना या इमारत बांधकामा विषयी संशय आल्याने त्यांनी या इमारतीचे वास्तुविशारद आर. ए. सावंत यांच्याकडून इमारतीची बांधकाम परवानगी, अकृषिक परवाना, इमारत आराखड्याची माहिती घेतली. सिध्दार्थ सृष्टी इमारतीची बांधकाम परवानगी १२ नोव्हेंबर २००८ ची ठाणे जिल्हा परिषदेने दिली असल्याची आढळले. या बांधकाम परवानगीच्या कागदपत्रांची म्हात्रे यांनी सत्यता पडताळणी कली.
बांधकाम परवानग्यांची सर्व कागदपत्रे बनावट आढळली. विकासकाने अधिकृत इमारतीचे आश्वासन देऊन त्यांनी आपली फसवणूक केली. या इमारतीमधील १४ सदनिका म्हात्रे यांना देण्याचे आश्वासन विकासक सिंह यांनी दिले होते. यामधील काही सदनिका विकासकाने परस्पर विक्री केल्याचे म्हात्रे यांना समजले.
करारनाम्यानुसार सदनिका देण्याचे आश्वासन देऊनही सदनिका, गाळे देण्यास विकासक आलोक रवींद्र सिंह टाळाटाळ करू लागले. उर्वरित आठ सदनिकांचा ताबा देण्याचे तोंडी आश्वासन दिले. म्हात्रे यांना देण्यात येणाऱ्या सदनिका सिंह यांनी अन्य लोकांना विक्री केल्याचे समजले. या जमीन व्यवहार प्रकरणात विकासक आलोक सिंह यांनी कराराचा भंग करून पाच कोटीची फसवणूक केली. म्हणून म्हात्रे यांनी विकासक सिंह, वास्तुविशारद आर. ए. सावंत ( रामबाग, कल्याण) यांच्या विरूध्द कल्याण न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने सिंह, सावंत यांच्या विरूध्द फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
