Dombivli Hawkers Protest: दिवाळी सणानिमित्त व्यवसाय करण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे तात्पुरती कोठेही मैदान किंवा मोकळी जागा उपलब्ध करून द्या, मगच फेरीवाल्यांवर कारवाई करा. डोंबिवली रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या बाहेर आम्ही व्यवसाय करण्यास तयार आहोत. नऊ महिन्यांपासून आम्ही दीडशे मीटरच्या बाहेरच व्यवसाय करत आहोत, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांना सुनावत सुमारे १५० फेरीवाल्यांनी शुक्रवारी रात्री डाॅ. राॅथ रस्ता भागात साहाय्यक आयु्क्त शिंदे यांना घेराव घातला. अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. दिवाळी सण आला आहे. त्यामुळे आम्हाला दिवाळी निमित्त सामान विक्री करण्यासाठी मोकळी जागा द्या त्या ठिकाणी आम्ही व्यवसाय करू, अशी भूमिका डोंबिवली पूर्व ग प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांनी घेतली. पालिका वरिष्ठांनी दिवाळी सणाचा विचार करून फेरीवाल्यांना आपल्या हद्दीतील मोकळ्या जागेत व्यवसाय करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात काही दिवस जागा उपलब्ध करून द्या, असे साहाय्यक आयुक्त शिंदे यांना सूचित केले आहे.

कारवाईने फेरीवाले संतप्त

साहाय्यक आयुक्त शिंदे यांनी फेरीवाल्यांना वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे व्यवसायासाठी मोकळी जागा उपलब्ध करून न देता शुक्रवारी फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील ग प्रभाग हद्दीतील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करताच, फेरीवाले संतप्त झाले. फेरीवाल्यांचे नेते बबन कांबळे यांच्या पुढाकाराने सुमारे दीडशेहून अधिक फेरीवाल्यांनी साहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांना घेराव घातला. यामध्ये महिला, पुरूष फेरीवाले सहभागी होते.

‘तुम्हाला वरिष्ठांनी दिवाळी सणानिमित्त आम्हाला व्यवसाय करण्यासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याचे सूचित केले आहे. तशी जागा उपलब्ध करून द्या, मग आम्ही त्या ठिकाणी व्यवसाय करतो,’ असे फेरीवाल्यांचे नेते बबन कांबळे साहाय्यक आयुक्त शिंदे यांना सांगत होते. यावेळी वरिष्ठांनी आम्हाला काही सांगितले नसल्याचे विधान शिंदे यांनी फेरीवाल्यांच्या समोर केल्याने कांबळे यांच्यासह फेरीवाले संतप्त झाले. ‘तुम्हाला वरिष्ठांनी मोकळी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याचे सूचित केले आहे. हे आम्हाला पक्के माहिती आहे. तुम्ही आमच्याशी खोटे का बोलता,’ असे प्रश्न कांबळे यांनी साहाय्यक आयुक्त शिंदे यांना केले.

एकावेळी १५० फेरीवाले एकावेळी जमा झाल्याने साहाय्यक आयुक्तांना त्यांनी अनेक प्रश्न विचारून बेजार केले. यावेळी साहाय्यक आयुक्त शिंदे निरूत्तर झाले. ग प्रभाग फेरीवाला हटाव पथकातील कामगार हताशपणे हा सर्व प्रकार पाहत होते.

पथकप्रमुख चुकीचा

ग प्रभागात सफाई कामगार भगवान पाटील यांना फेरीवाला हटाव पथक प्रमुख नेमण्यात आले आहे. पाटील हे जे प्रभागात असताना फेरीवाल्याकडून हप्ता घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यांची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत एका वादग्रस्त फेरीवाल्यांशी संधान असलेल्या कामगाराला ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकप्रमुख करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाटील यांच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसल्याचे साहाय्यक आयुक्त शिंदे सांगतात.

कारवाईचा देखावा

ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगार सुनीलनगर, गांधीनगर, शिवमंदिर, तुकारामनगर, आयरे रस्ता भागातील फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करतात. तेथील हातगाड्या जप्त करतात आणि आम्ही रेल्वे स्थानक भागात कारवाई केली असा देखावा करतात, अशी धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. ग प्रभागात तगडा साहाय्यक आयुक्त, पथकप्रमुख नेमण्याची मागणी नागरिक करत आहेत.