डोंबिवली : रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आत फेरीवाल्यांना बसू देण्यास न्यायालयाचे मनाई आदेश असताना डोंबिवली पूर्व ‘ग’ प्रभाग हद्दीत रेल्वे स्थानक भागात फेरीवाले सकाळ, सायंकाळी रस्ता, पदपथ अडवून बसत असल्याने कल्याण-डोंबिवली पालिका ‘ग’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांनी प्रभागातील फेरीवाला हटाव पथकप्रमुख कादर रेवडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शिवाय फेरीवाला पथकातील इतर कामगारांना कर्तव्यात कसूर केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी डोंबिवली स्थानक भागातील उर्सेकरवाडीत व्यवसायासाठी बसण्यावरून फेरीवाले व तेथील प्रस्थापित यांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता. त्यात एका गटाने फेरीवाल्याला बेदम मारहाण केली. हे प्रकरण रामनगर पोलीस ठाण्यात गेले होते. या हाणामारीची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती.
आयुक्त अभिनव गोयल यांनी स्थानक भागात एकही फेरीवाला बसता कामा नये, असे आदेश दिले असताना रात्री उशिरापर्यंत फेरीवाले बसत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘ग’ प्रभागात फेरीवाला नियंत्रणाचे काम साहाय्यक आयुक्तांनी यापूर्वी जे प्रभागात फेरीवाल्यांकडून हप्ता घेताना पकडलेले व त्यानंतर निलंबित झालेल्या भगवान पाटील, यापूर्वीच्या साहाय्यक आयुक्तांनी नेहमीच तंबी दिलेल्या पथकप्रमुख कादर रेवडी व नरेंद्र कोबाळकर पाहत आहेत.
‘ग’ प्रभागात सकाळी फेरीवाला नियंत्रक म्हणून कोबाळकर काम पाहतात. तर सायंकाळी रेवडी काम पाहतात. दुपारी भगवान पाटील काम पाहतात. भगवान पाटील यांना फेरीवाल्यांकडून हप्ता घेताना पकडले असताना त्यांना पुन्हा फेरीवाला पथकात आणले कुणी,असे प्रश्न आता पालिकेत, कर्मचारी व नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. हे तिघे तीन सत्रांत फेरीवाला नियंत्रणाचे काम करत असले तरी त्यांच्या कालावधीत डोंबिवली स्थानक परिसर फेरीवाल्यांनी गजबजलेला असतो. त्यामुळे फेरीवाला हटाव पथकातील काही कामगारांचे फेरीवाल्यांशी संधान असल्याची चर्चा आहे. तसा संशय शिवसेना जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी व्यक्त केला.
‘फ’ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगार फेरीवाल्यांना आपल्या हद्दीत बसून देत नसताना ‘ग’ प्रभागात ही कारवाई फेरीवाला नियंत्रक कामगार का करत नाहीत, असे प्रश्न नागरिक करत आहेत. याविषयी काही जागरूक नागरिकांनी पालिका अधिकाऱ्ऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. ‘ग’ प्रभागात १३ कामगार कार्यरत आहेत. तरीही स्थानक भागात फेरीवाल्यांनी पथारी पसरलेली असते.
प्रभागाच्या इतर भागांतही हातगाड्या लागण्यास सुरुवात झाल्याच्या तक्रारी आहेत. आयुक्त गोयल यांनी तंबी देऊनही ‘ग’ प्रभाग फेरीवाला हटाव पथकातील कामगार फेरीवाल्यांची पाठराखण करत असल्याने आयुक्तांनी अशा कामगारांची माहिती काढून त्यांच्यावर निलंबन कारवाईचीमागणी होत आहे.
शिवसेनेचा इशारा
डोंबिवली पूर्व ‘ग’ प्रभाग हद्दीत फेरीवाल्यांचा उपद्रव वाढला आहे. स्थानक परिसरातील रस्ते सकाळपासून फेरीवाल्यांनी गजबजून जातात. या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आंदोलनाचा निर्णय घेतला होता. पण कारवाईचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले आहे. हे आंदोलन करण्याची वेळ येऊन न देता आपण तातडीने फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करावी व जे कामगार फेरीवाल्यांशी संधान साधतात. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी केली आहे. फेरीवाल्यांचा उपद्रव सुरूच राहिला तर मात्र शिवसेनेकडून आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
