डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील स्वामी विवेकानंद अरूणोदय शाखेजवळील गायकवाड वाडी भागातील पायवाटा, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागातील रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांना वेळोवेळी या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या भागाचे एकूण तीन नगरसेवक आहेत, पण एकही नगरसेवक या भागातील दुरवस्थेकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या.

महात्मा फुले रस्त्यावरील गायकवाडी भागात नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. या भागात जुन्या चाळी आहेत. शहरातील जुन्या वस्तीचा हा भाग आहे. महात्मा फुले रस्त्यावरून पादचारी गायकवाड वाडीतील मधल्या रस्त्याने सुभाष रस्ता भागात जातो. त्यामुळे या भागात सतत दुचाकी, पादचारी नागरिकांची वर्दळ असते. या भागात स्थानिक रहिवासी, बाहेरील वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे अनेक वर्षापूर्वी केलेल्या या भागातील पायवाटा, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, असे रहिवाशांनी सांगितले.

गायकवाड वाडी प्रभागातील पायवाटा, रस्त्यांवर खड्डे पडल्याने या खड्य्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. या तुंबलेल्या पाण्यावर डासांंची उपत्ती होते. त्याचा त्रास वस्तीला होत आहे. शाळकरी मुले, त्यांचे पालक या स्त्यावरून येजा करतात. शाळांची लहान वाहने या भागातून येजा करतात. त्यांनाही या खड्ड्यांचा त्रास होतो.

स्थानिक नगरसेवकांनी गायकवाड वाडीतील रस्ते, पायवाटा दुरवस्थेविषयी लक्ष घालून या भागातील खड्डे समस्या दूर करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. पुढील आठवड्यात गायकवाड वाडी भागातील रहिवाशांचे एक शिष्टमंडळ पालिका मुख्यालयात आयुक्त अभिनव गोयल यांच्या भेटीसाठी जाणार आहे. या भेटीत गायकवाड वाडी भागाकडे पालिका प्रशासनाचे असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे रहिवाशांना होत असलेल्या त्रासाची माहिती देण्यात येणार आहे. स्थानिक तीन नगरसेवकांना या भागातील रहिवासी निवेदन देऊन गायकवाड वाडी भागातील रस्त्यांवरील, पायवाटेवरील खड्डे सुस्थितीत करण्याची, या भागात पदपथ तयार करण्याची मागणी करणार आहेत.

या मागण्यांची पालिका प्रशासन, नगरसेवकांनी दखल घेतली नाहीतर मात्र गणेशोत्सवानंतर पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा या भागातील रहिवाशांनी दिला आहे.

गायकवाडी भागाची नागरी वस्ती वाढत आहे. या भागात वाहनांची वर्दळ अधिक आहे. या परिसरातील रस्ते, पायवाटांची दुरवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाकडे मागणी करूनही आमच्या भागाकडे पालिका अधिकारी लक्ष देत नाहीत. – रमेश गायकवाड रहिवासी.

गायकवाडी भागातील रस्ते, पायवाटांची पाहणी केली जाईल. तेथे रस्ते, पायवाटांची दुरवस्था झाली असेल तर याविषयी ते सुस्थितीत करण्याची कामे तातडीने हाती घेतली जातील.- मनोज सांगळे कार्यकारी अभियंता.