डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील ध. ना. चौधरी विद्यालय रस्त्यालगत श्री लक्ष्मी नारायण प्रसाद इमारतीच्या एका सदनिकेत छापा टाकून टिळकनगर पोलिसांनी धनदांडगे, व्यावसायिकांचा जुगार अड्डा उद्वस्त केला. पोलिसांच्या या कारवाईने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. डोंबिवली शहर परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये काही व्यावसायिक, धनंदांडगे, व्यापारी इमारतीमधील इतर रहिवाशांना समजून येणार नाही अशा छुप्या पद्धतीने जुगार अड्डे चालविले जात असल्याची शहरात चर्चा आहे. अशाच पध्दतीने डी. एन. सी. रस्त्यालगतचा जुगार अड्डा चालविता जात होता.

श्री लक्ष्मी नारायण प्रसाद इमारतीमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नवनीतनगर देसलेपाडा येथे राहणारे राहुल अमृतलाल छेडा, सागावमधील मारूती काॅम्पलेक्समध्ये राहणारे निमेश कमलेश ठक्कर, रुणवाल माय सिटीत राहणारे जयंतीलाल नरसी घोरी, आनंदनगरमध्ये राहणारे मुकेश प्रधान भानुशाली, नवी मुंबईतील घणसोली सेक्टर १५ मध्ये राहणारे दीपक मंगे यांना ताब्यात घेतले. या जुगार अड्ड्यावर १६ हजार रूपयांची रक्कम आणि साहित्य जप्त केले. टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवालदार उमेश राठोड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधित कायद्याने या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंजीर यांनी आपल्या सहकाऱ्यांना पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालून अवैध व्यवसायांवर कारवाई केल्याचे सांगितले. गेल्या आठवड्यात पोलिसांचे पथक एकतानगर मधील एका नगरसेवकाच्या कार्यालयाजवळ आले असता डी. एन. सी. रस्त्यालगत दर्या फॅमिली रेस्टाॅरंटच्या समोरील भागात श्री लक्ष्मी नारायण प्रसाद इमारतीच्या ४०१ सदनिकेमध्ये काही जुगारी २७ पानी जुगार पैसे लावून खेळत आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी पंच, साक्षीदार सोबत घेतले. त्या सदनिकेवर छापा टाकाला. टिळकनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सातपुते, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, हवालदार तडवी, पवार, पारखे, तडपे, कमोदकर, दळवी सहभागी झाले होते.