डोंबिवली : डोंबिवलीती जवळील खंबाळपाडा येथे एका सदनिकेत तीन रिक्षा चालकांनी आपल्या परिचयाच्या एका २२ वर्षाच्या तरूणीला मेजवानीचे निमित्त करून बोलावून घेतले. मेजवानी ऐन रंगात आली असताना या तिन्ही रिक्षा चालकांनी संगनमत करून या तरूणीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. अचानक घडलेल्या या सगळ्या प्रकाराने पीडित तरूणी अस्वस्थ झाली. हा सगळा प्रकार तिने धाडसाने टिळकनगर पोलीस ठाण्यात येऊन कथन केला. पोलिसांनी तातडीने याप्रकरणातील तिन्ही रिक्षा चालकांना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींना कल्याण जिल्हा न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांनी सांगितले.
चेतन चौहान, हेमंत चौहान, उमेश वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकांची नावे आहेत. हे तिघे डोंबिवली परिसरात रिक्षेच्या माध्यमातून प्रवासी वाहतुकीचे काम करतात. पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यामधील एक रिक्षा चालक रिक्षा चालकांना आरटीओच्या माध्यमातून परवाना मिळवून देण्यासाठी मध्यस्थाची कामे करतो.
ही तरूणी सुरक्षा रक्षक म्हणून डोंबिवलीतील एका खासगी सुरक्षा एजन्सीत नोकरी करते. डोंबिवलीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याने तिची रिक्षा प्रवासाच्या दरम्यान डोंबिवलीतील काही रिक्षा चालकांशी ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले होते. आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना या रिक्षा चालकांशी या पीडित तरूणीचा संपर्क आणि संवाद होत होता. पीडित तरुणी मूळची सोलापूरची रहिवासी आहे.
या तरूणीशी घट्ट मैत्री झाल्यानंतर तिन्ही रिक्षा चालकांनी या पीडित तरूणीला आपण मेजवानी करू अशी गळ घातली. तिन्ही रिक्षा चालक खास परिचित असल्याने आणि त्यांच्याकडून कोणतेही दृष्कृत्य होण्याची शक्यता नसल्याने तरूणीने या तिन्ही रिक्षा चालकांसोबत मेजवानीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली. हे रिक्षा चालक आपल्याशी काही गैरवर्तन करतील याची थोडीही कल्पना तिच्या मनात आली नाही.
या तिन्ही रिक्षा चालकांनी या पीडित तरूणीला डोंबिवली जवळील खंबाळपाडा येथील एका रिक्षा चालकाच्या सदनिकेवर नेले. तेथे मेजवानी सुरू असताना आणि ऐन रंगात आली असताना या तिन्ही रिक्षा चालकांनी बेसावध असलेल्या तरूणीवर आळीपाळीने सामुहिक लैंगिक अत्याचार केला. या घडल्या घटनेने पीडित तरूणी अस्वस्थ झाली. तिने या तिन्ही रिक्षा चालकांना प्रतिवाद केला, पण ते समुहाने तिचा प्रतिकार हाणून पाडत होते.
या तिन्ही रिक्षा चालकांच्या तावडीतून सुटका करून घेत पीडित तरूणी टिळकनगर पोलीस ठाण्यात आली. तिने स्वताभोवती घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास पथक तयार करून पोलिसांनी या तिन्ही रिक्षा चालकांना अटक केली. दुसऱ्या एका घटनेत डोंबिवलीत गोग्रासवाडीत एक पुजाऱ्याने एका बालिकेवर लैंगिक अत्याचार केला आहे. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
