डोंबिवली – डोंबिवली पश्चिम गरीबाचापाडा प्रभागात पालिकेच्या गरीबाचापाडा पाडा अग्निशमन केंद्रासमोरील भागात पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून स्थानिकाने चोरटी नळ जोडणी घेतली होती. याठिकाणी रस्ते काँक्रिकीटीकरणासाठी खोदाईचे काम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी पालिकेच्या मुख्य जलवाहिनीतून अति उच्चदाबाने पाणी सुरू झाले. त्यावेळी चोरून घेतलेली नळजोडणी उच्च दाबाने फुटून बाजुला उडाली. त्यामुळे या जलवाहिनीतून उच्चदाबाने पाणी उडून बाहेर पडले. यावेळी शेकडो लीटर पाणी वाया गेले. डोंबिवली पश्चिम गरीबाचावाडा भागात कुस्तीगीर परशुराम पाटील मार्गावर पालिका अग्निशमन केंद्राच्या भागात सिमेंट काँक्रीट कामासाठी रस्त्यांची खोदाई खनन (जेसीबी) यंत्राच्या साहाय्याने सुरू आहे. खनन यंत्र चालकाने सावधगिरी बाळगून भूमिगत जलवाहिन्या आहेत याचा विचार करून खोदकाम केले होते. त्यामुळे भूमिगत जलवाहिन्यांना धक्का लागला नव्हता.
जलवाहिनी फुटली
शुक्रवारी सकाळी खोदकामाच्या ठिकाणी खनन यंत्राने (जेसीबी) खोदकाम सुरू नव्हते. तेथे कोणीही नागरिक काही काम करत नव्हता. अचानक गरीबाचापाडा अग्निशमन केंद्रासमोरील पालिकेची भूमिगत जलवाहिनी फुटून १० ते १५ फूट उंच उच्च दाबाने पाणी उडू लागले. परिसरातील रहिवासी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले. जलवाहिनी फुटल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाला आणि खनन काम करणाऱ्या जेसीबी चालकाला जाब विचारला. त्यावेळी त्यांनी आम्ही भूमिगत जलवाहिनीमुळे अतिशय काळजीपूर्वक या रस्त्यावर कामे करत आहोत. त्यामुळे आमच्या हातून ही जलवाहिनी फुटली नाही अशी उत्तरे रहिवाशांना दिली.
चोरी सापडली
रहिवाशांनी मग ही जलवाहिनी अचानक कशी फुटली याची तपासणी जलवाहिनीच्या ठिकाणी केली. त्यावेळी त्यांना पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळेत छिद्र पाडून त्यामधून आपल्या घरामध्ये मुबलक पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था केली होती. हे छिद्र पाडल्यावर त्याठिकाणी जोडणी यंत्रणाने आवश्यक लिंपण केले नव्हते. तकलादू पध्दतीने ही जोडणी जोडून घेऊन त्या ठिकाणी लवचकिता ठेवली होती. शुक्रवारी दुपारी उच्च दाबाने पालिकेच्या मुख्य जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू होताच, लवचकिता असलेला चोरट्या नळ जोडणीचा भाग उडाला आणि त्यामधून पाणी बाहेर पडले, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
रहिवाशाच्या एका चुकीमुळे शेकडो लीटर पाणी फुकट गेले. त्यामुळे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गरीबाचापाडा भागात चोरून नळजोडणी घेणाऱ्या पाणी चोर रहिवाशावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गरीबाचापाडा भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. पालिकेच्या अभियंत्याने यासंदर्भात आपण स्वता घटनास्थळी जाऊन पाहणी करतो, असे सांगितले.
