डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील जयहिंद काॅलनी भागातील गावदेवी जलकुंभावरून टँकरने पाणी टंचाई असलेल्या शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा केला जातो. दररोज हे टँकर जलकुंभाच्या वाहिकेतून भरले जातात. टँकर भरल्यानंतर तेथे २० मिनिटे जलकुंभाकडून आलेली वाहिका बंद करण्यासाठी नियंत्रक कर्मचारी किंवा टँकर चालक राहत नसल्याने दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात आहे.

कल्याण, डोंबिवली शहरांच्या अनेक भागात नियमित पाणी टंचाई आहे. पाणी मिळण्यासाठी नागरिकांचे भर पावसात मोर्चे निघाले आहेत. आता तर दुष्काळाचे गंभीर सावट घोंघावत आहे. पाणी जपून वापरण्यासाठी शासनाने कठोर निर्देश दिले आहेत. पाण्याच्या बेसुमार वापरावर शासनाकडून निर्बंध आले आहेत. अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील गावदेवी येथील जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरत असताना पाणी पुरवठा नियंत्रक कर्मचारी तेथे थांबत नसल्याने दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात आहे.

जलकुंभ भागातील अनेक नागरिक घरातून बाहेर येऊन जलकुंभातून टँकरमध्ये पडत असलेले पाणी थांबविता येते का याची चाचपणी करत असतात. पण त्यांना पाणी बंद करण्याची माहिती नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये पाणी सुरू केली की तेथे नियमाप्रमाणे पाणी पुरवठा पालिका कर्मचारी, टँकर चालक यांनी उपस्थित राहावे, अशी मागणी होत आहे.

पाणी वाया गेल्यास कर्मचाऱ्यावर कारवाई

चालक आणि पाणी पुरवठा नियंत्रक हे चहा पिण्यासाठी जलकुंभाच्या परिसरात निघून जातात. तेथे गप्पा मारत असताना त्यांना टँकर भरला असल्याचे भान राहत नाही. त्यामुळे या घटना घडतात, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. पालिका आयुक्तांनी ज्या ठिकाणाहून पाण्याचे टँकर भरले जातात. तेथील कर्मचाऱ्यांनी टँकर भरत असताना ते ठिकाण सोडू नये अशा सक्त सूचना देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्याने अशाप्रकारे पाणी फुकट जाणे योग्य नाही. संबंधित कर्मचाऱ्यावर असे पाणी फुकट जात असले तर कारवाई केली जाईल. आता पालिकेच्या टँकर भरत असलेल्या सर्व जलकुंभांवरील कर्मचाऱ्यांना पाणी टँकरमध्ये भरत असताना तेथेच थांबण्याच्या सूचना केल्या जातील. आणि पाण्याचा एकही थेंब फुकट जाणार नाही, अशा सूचना केल्या जातील असे सांगितले.

पालिकेच्या गावदेवी जलकुंभांवर नियमित टँकरमध्ये पाणी भरणी सुरू झाली की तेथील पाणी पुरवठा नियंत्रक तेथून गायब होतो. टँकर चालक चहापाण्यासाठी बाहेर जातो. तोपर्यंत टँकर भरून शेकडो लीटर पाणी फुकट जाते. शहराच्या अनेक भागात पाणी टंचाई आहे. अशापरिस्थितीत पाणी फुकट जाणे योग्य नाही. आयुक्तांनी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे.- मकरंद माडखोलकर रहिवासी, उमेशनगर डोंबिवली.