डोंबिवली : डोंबिवली पूर्व गोग्रासवाडी परिसरातील एका अनधिकृत गोठ्यामुळे निर्माण झालेली दलदल व अस्वच्छतेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये याच परिसरात एका शाळकरी मुलीच्या अंगावर बैल धावून आल्याने शेणखळीतील दलदलीत अडकली होती. त्यावेळी स्थानिकांनी तिला बाहेर काढले होते.
गोग्रासवाडी परिसरात गेली अनेक वर्षे अनधिकृत गोठा सुरू आहे. त्यात स्वच्छतेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. शेणखळीमुळे मोठ्या प्रमाणात दलदल तयार झाली आहे. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सातत्याने सहन करावा लागत आहे. या गोठ्याच्या आसपास प्राचीन कृष्ण मंदिर, पंचमुखी, दक्षिणमुखी मारुती मंदिर, मोठे जैन मंदिर व प्रकाश विद्यालय आहे. त्यामुळे या परिसरात दररोज शेकडो विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व दलदल दिसत असल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यापारी तीव्र नापसंती व्यक्त करीत असल्याचे माजी नगरसेवक ॲड. मनोज घरत यांनी सांगितले.
आरोग्याचा प्रश्न
या गोठ्यातील अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डेंग्यू, हिवताप अशा साथींचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न वारंवार उपस्थित करूनही महापालिका प्रशासनाकडून केवळ तात्पुरती कारवाई केली जाते. या गोठ्यातील अनेक गाई सकाळी वेगवेगळ्या व्यक्तींकडून मंदिर परिसरात आणल्या जातात. तेथे गाई दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक गाईंना चारा खाऊ घालतात. त्यानंतर दुपारनंतर या गाई पुन्हा गोठ्यात आणल्या जातात. या गायींची देखभाल व स्वच्छतेबाबत मात्र कोणतीही योग्य व्यवस्था नाही, असे ॲड. घरत यांनी सांगितले.
सध्या पितृपक्ष सुरू असून हिंदू धर्मीय नागरिक मोठ्या श्रद्धेने आपल्या पितरांच्या स्मरणार्थ गाईंना चारा खाऊ घालण्यासाठी या परिसरात येत आहेत. या ठिकाणी असलेल्या दलदलीचा अंदाज न आल्यामुळे भाविकांनाही शेणखळीचा धोका निर्माण होत आहे, असे स्थानिकांनी सांगितले.
पालिकेविषयी संताप
वारंवार तक्रारी करूनही या पालिका अनधिकृत गोठ्यावर कायमस्वरूपी कारवाई का केली जात नसल्याने गोग्रासवाडी परिसरातील रहिवासी पालिकेच्या थंड भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. गोग्रासवाडी गोशाळेचा स्वतःच्या मालकीचा अधिकृत गोठा असून तेथे जनावरांची योग्य प्रकारे देखभाल केली जाते. त्या गोठ्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होत नाही. मग या अनधिकृत गोठ्याबाबतच प्रशासनाकडून ठोस कारवाई का केली जात नाही, असे प्रश्न ॲड. मनोज घरत यांच्यासह इतर नागरिकांनी केले आहेत. गोग्रासवाडीतील शेणखळीविषयी नागरिकांच्या जीवाला धोका असल्याने या शेणखळी बंद करण्यासाठी पालिका आयु्क्तांनी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गोग्रासवाडीतील अनधिकृत शेणखळीविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत. दरवर्षी एकतरी नागरिक या शेणखळीच्या दलदलीत अडकतो. स्थानिकांच्या मदतीने या नागरिकांना वाचविण्यात येते. पण पालिका या शेणखळीत कोणाचा जीव जाण्याचा वाट पाहत आहे का. ही शेणखळ कायमची बंद करण्यासाठी पालिकेन तातडीने पावले उचलावीत. ॲड. मनोज घरत माजी नगरसेवक.
