डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील वर्दळीच्या वीर सावरकर रस्त्यावर मागील आठवड्यात हातात कोयता आणि रिकामी दारूची बाटली घेऊन दहशत पसरविणारा बंटी प्राणगोविंद सरकार (४८) या गुंडाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.
डोंबिवली पूर्वेत वीर सावरकर मार्गावर एक इसम रात्रीच्या वेळेत हातात कोयता आणि दारूची बाटली घेऊन फिरत असल्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. ही चित्रफिती डोंबिवली पूर्व भागातील असल्याची खात्री पटल्यावर रामनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तातडीने आपल्या पथकाला सूचना देत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
रामनगर पोलिसांचे गस्ती पथक शोध घेत असताना एका मद्य विक्री दुकानाच्या बाजुला सार्वजनिक रस्त्यावर हा इसम हातात कोयता घेऊन हवेत फिरवत, समोरून येणाऱ्याला भीती दाखवत दहशत पसरवित असल्याचे निदर्शनास आले. पळण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने आपले नाव बंटी प्राणगोविंद सरकार असल्याचे सांगितले. तर तो सार्वजनिक शौचालय भागात राहत असून मजुरी करत असल्याची माहिती त्याने दिली.
पोलिसांनी त्याच्या जवळील कोयता, रिकामी दारूची बाटली जप्त केली. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, दारूची बाटली घेऊन फिरल्याने पोलिसांनी बंटी विरूध्द शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्याने कुर्बान तडवी यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बंटी विरूध्द आणखी काही गुन्हे आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.
