ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि स्वस्त फर्निचर बाजार म्हणून कशेळीचा परिसर ओळखला जातो. या बाजारातील एका फर्निचर गोदामाला गुरूवार सकाळी आग लागली. तीन तासानंतरही आग आटोक्यात आलेली नसून या आगीत आसपासची सात ते आठ गोदामे जळून खाक झाल्याचे बोलले जात आहे. गुढी पाडव्याच्या दिवशीच घडलेल्या घटनेमुळे येथील व्यापारी वर्गाला मोठा धक्का बसला आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील कशेळी तसेच उल्हासनगर परिसरात फर्निचरची मोठमोठी गोदामे आहेत. त्यामध्ये कशेळी भागात सर्वात मोठा फर्निचर बाजार आहे. याठिकाणी असलेल्या गोदामांमध्येच फर्निचर तयार केले जाते, खुर्ची, सोफा, पलंग, टेबल, कपाटे तसेच विविध प्रकारचे फर्निचर तयार करण्यात येते. यामुळे येथे स्वस्त फर्निचर उपलब्ध होते. यामुळे येथे फर्निचर घेण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी नेहमीच दुकानांमध्ये गर्दी दिसून येते. अनेक गोदामांची बांधकामे बेकायदा असून त्यात ही दुकाने थाटण्यात आलेली आहेत. या गोदामांचा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे. तसेच याठिकाणी कोणत्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणा नसून आसपासच्या पालिकांची आग विजविण्यासाठी मदत घ्यावी लागत आहे. यापुर्वी गोदामांना लागलेल्या आगीच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी पुन्हा असाच प्रकार समोर आला.

गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी ११.३० वाजता कशेळी पुलालगत असलेल्या चामुंडा कॉम्प्लेक्स मधील फर्निचरच्या गोदामाला आग लागली. गोदामातील फर्निचरने पेट घेतल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच, भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन वाहन जंबो वॉटर टँकरच्या साहाय्याने जवानांनी आग विजविण्याचे काम सुरू केले पण, अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही.

या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत नसली तरी, गोदामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत असे भिवंडी अग्निशमन केंद्र यांच्याकडून सांगण्यात आले. तीन तासाहून अधिकचा वेळ झाला असून यात सात ते आठ गोदाम जळून खाक झाले आहे.