Dombivli Haircut Rates Hike: वाढत्या महागाईचा विचार करून डोंबिवलीतील नाभिक समाज संघटनेने केस कापण्याच्या दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह राज्याच्या इतर भागातील नाभिक समाज संघटनांनी वाढत्या महागाईचा विचार करून केस कापण्याचे दर वाढविले आहेत. त्यामुळे डोंबिवलीतील नाभिक समाज संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत केस कापण्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला.
केस कर्तनालयांमध्ये अलीकडे केस कापण्यासाठी अत्याधुनिक पध्दतीची साधने वापरली जातात. या साधनांच्या किंमती दामदुप्पट असतात. या साधनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च असतो. तसेच, केस कर्तनालयांमध्ये सौंदर्य प्रसाधने वापरावी लागतात. यापूर्वी सरसकट केस कापले जात होते. आता प्रत्येक ग्राहकाची केस कापून घेण्याची पध्दत वेगळी असते. त्यामुळे त्या प्रमाणेच केस कापून द्यावे लागतात.
असे विशिष्ट पध्दतीने केस कापण्यासाठी कौशल्यधारित कारागिर दुकानात ठेवावे लागतात. या कारागिरांना दरमहा त्यांची मजुरी द्यावी लागते. अलीकडे केस कापण्यासाठी कारागिर मिळत नाहीत, त्यामुळे आहे त्या कारागिरांना सांभाळून ठेवण्यासाठी केस कर्तनालय चालविणाऱ्या दुकान मालकांना विशेष मेहनत घ्यावी लागते, असे डोंबिवली नाभिक समाज संघटनेचे खजिनदार प्रकाश उर्फ बाळा पवार यांनी सांगितले.
बैठकीत निर्णय झाल्या दिवसापासून डोंबिवलीत केस कापण्याचे नवीन दर लागू झाले आहेत, असे डोंबिवली नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब राऊत यांनी सांगितले. केस कापण्याचे दर वाढविण्याच्या विषयावरील आयोजित बैठकीला कार्यकारी मंडळाचे संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब राऊत, सचिव मंगेश पोफळे, खजिनदार प्रकाश उर्फ बाळा पवार, उपाध्यक्ष रमेश वखरे, सहसचिव अशोक आतकरे, सहखजिनदार तुषार शिंदे, विश्वस्त कृष्णा कारूडकर, दशरथ चित्ते, संतोष आवटे, शिवाजी वैद्य, संतोष शर्मा, उत्सव समिती पदाधिकारी सोमीनाथ वरपे, कृष्णा कदम, महेश काशीद, आसाराम अतकरे, संतोष खंडागळे, डी. एस. महाले, रईस सलमानी, बाळू झांबरे उपस्थित होते.
केस कापण्याचे दरपत्रक
केस कापणे वातानुकूलित दुकानात १५० रूपये, साध्या दुकानात १२० रूपये, आकर्षक पध्दतीने केस कापणे वातानुकूलित दर २०० रूपये, साध्या दुकानातील दर १५० रूपये, केसांना कट मारणे वातानुकूलित १०० रूपये, साधे दुकान ८० रूपये, दाढी वातानुकूलित १०० रूपये, साधे दुकान ८० रूपये, जावळ एक हजार १११ रूपये, मुंज दोन हजार १०० रूपये, मिशी कट ५० रूपये, बगल ५० रूपये.
नाभिक समाजाची नियमावली
केस कापण्याची सेवा घरी जाऊन दिल्यास प्रवास खर्च आणि केस कापण्याचा दुप्पट दर आकारण्यात येईल. निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दर आकारल्यास पाच हजार रूपये दंड आकारण्यात येईल. सौंदर्य प्रसाधनांचे दर, सेवांचे दर उत्पादनाच्या बाजारमुल्याप्रमाणे आकारले जातील, असे नाभिक समाज संघटनेने जाहीर केले आहे.
