डोंबिवली – डोंबिवली पूर्व भागातील उर्सेकरवाडी मधुबन सिनेमा गल्लीत एकही फेरीवाला दिसता कामा नये. एक फेरीवाला दिसला तरी ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील सर्व कामगारांना निलंबित करीन,अशी तंबी गेल्या दीड महिन्यापूर्वी डोंबिवलीतील फेरीवाला हटाव पथकातील कामगार आणि अधिकाऱ्यांना आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली होती. तरीही डोंबिवली पूर्वेतील ग प्रभाग हद्दीत सर्वाधिक वर्दळीच्या उर्सेकरवाडीत व्यवसाय करण्यासाठी रस्ता अडवून जागेवर बसण्यावरून फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारीची घटना शनिवारी घडली आहे. या घटनेने ग प्रभाग हद्दीत फेरीवाल्यांचा तळ कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या हाणामारीवरून एका फेरीवाल्याने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आत एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशाची डोंबिवली पूर्व फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर, फेरीवाला हटाव पथक प्रमुख मिलिंद गायकवाड यांच्याकडून काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.

या प्रभागात रेल्वे स्थानक भागातील नेहरू रस्ता परिसरातील फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जात आहे. परंतु, याच प्रभागाच्या लगत असलेल्या डोंबिवली पूर्व ग प्रभागातील फेरीवाल्यांवर ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जयराम शिंदे आणि फेरीवाला हटाव पथकाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी नागरिक, रेल्वे स्थानक भागातील व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

ग प्रभागात फेरीवाले

आयुक्त अभिनव गोयल यांनी मधुबन गल्लीत एक दिवत्र रात्री आठ वाजता अचानक येऊन ग आणि फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील ३२ कामगार, दोन अधिकारी यांना रांगेत उभे करून रेल्वे स्थानक भागात एक जरी फेरीवाला दिसला तर तुम्हाला सर्वांना एकावेळी निलंबित करीन, अशी तंबी दिली होती. या इशाऱ्यामुळे कामगारांसह अधिकारी घाबरले होते. तरीही ग प्रभाग हद्दीत मधुबन गल्ली, डाॅ. राॅथ रस्ता, कामत मेडिकल पदपथ भागात, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी भागात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फेरीवाले तळ ठोकुन बसत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

ग प्रभागाच्या शिवमंदिर रस्ता, मानपाडा रस्ता, दत्तनगर, आयरे रस्ता, राजाजी रस्ता भागात फेरीवाले, हातगाडीवाल्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आयुक्त गोयल यांनी अचानक एक दिवस ग प्रभागाचा दौरा करून या फेरीवाल्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकारी, कामगारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

फेरीवाल्यांमध्ये हाणामारी

उर्सेकरवाडी मधुबन गल्ली भागात काही फेरीवाले यापूर्वी फेरीवाल्यांचा व्यवसाय करत होते. पालिकेचे कारवाई सुरू असल्याने या फेरीवाल्यांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. परंतु, काही परप्रांतीय फेरीवाले ग प्रभाग पालिका कामगारांच्या आशीर्वादाने त्या जागेवर व्यवसाय करत असल्याचे व्यवसाय बंद ठेवलेल्या फेरीवाल्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या जागेवर आपण व्यवसाय करू नये असे सूचित केले. त्याला व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्याने जोरदार विरोध केला.

यावरून दोन्ही गटात शिवीगाळ आणि जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. आयुक्त गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी याप्रकरणाची चौकशी करून ग प्रभागातील दोषी अधिकारी, कामगारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. अधिक माहितीसाठी साहाय्यक आयुक्त शिंदे यांना संपर्क साधला. तो होऊ शकला नाही.