डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील ग आणि फ प्रभागातील फेरीवाले हटविण्याची कारवाई प्रशासनाने मागील तीन महिन्यांपासून सुरू केली आहे. फ प्रभागातील बहुतांशी फेरीवाले बिमोड केल्याने गायब झाले असून, ग प्रभागातील फेरीवाले मात्र उर्सेकरवाडी, डाॅ. राॅथ रस्ता भागातून हटण्यास तयार नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. फेरीवाल्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे नगरसेवक, नागरिक तीव्र चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे दोन दिवसापूर्वी फ, ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने मोठ्या कौशल्याने फेरीवाल्यांना उर्सेकरवाडीत चारही बाजुने कोंडून, दुकानात दडवून ठेवलेला माल बाहेर काढुन तीन टेम्पो सामान जप्त केले.

तीन महिने डोंबिवलीत सतत कारवाई होऊन डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटत नसल्याने नगरसेवक नाराज आहेत. याविषयी आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच महासभेत स्थानिक नगरसेविका रंजना पेणकर, उपमहापौर राहुल दामले यांनी फेरीवाल्यांचा विषय महासभेत उपस्थित करून डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी आता आयुक्तांनी पुढाकार घ्यावा. नागरिक, रेल्वे स्थानकातील प्रवाशांना या फेरीवाल्यांचा प्रचंड उपद्रव होत आहे.

नागरिकांना रेल्वे स्थानक भागातून चालणे अवघड होते. फेरीवाला हटाव पथकातील कामगार अधिकाऱ्यांचे ऐकत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे अधिकारी सांगतात, असे नगरसेविका पेणकर यांनी महासभेत सांगितले. तुम्ही याठिकाणी व्यवसाय का करता असे प्रश्न केल्यावर तुम्ही असे आम्हाला कोण, असे उलट उत्तरे हे फेरीवाले देतात.

प्रशासनात जर समन्वय नसेल तर मग नगरसेवक, नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा. डोंबिवली पूर्व फेरीवाल्यांचा विषय कायमचा सोडविण्यासाठी आयुक्तांनी या विषयात लक्ष घालण्याची मागणी रंजना पेणकर यांनी केली.

उपमहापौर राहुल दामले यांनी उर्सेकरवाडी, राॅथ रस्ता भागातील फेरीवाले विषय सोडविण्यासाठी आमदार राजेश मोरे यांचे साहाय्य घेतले जाईल. त्याशिवाय हा विषय कायमचा संपणार नाही. फेरीवाले विषयावर आपण सर्वांनी एकत्र झालो तरच हा विषय कायमचा संपुष्टात येईल. अन्यथा मोजके नगरसेवक फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पुढाकार घेतात आणि काही त्यांना बसविण्यासाठी पुढाकार घेतात. त्यामुळे ही समस्या कायम राहत असल्याचे दामले यांनी सांगितले.

गनिमी काव्याने धडा

दोन दिवसापूर्वी फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांनी रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवरून एकट्याने जाऊन फेरीवाल्यांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून रेल्वे तिकीट काढले. आपण प्रवास करत आहोत असा देखावा उभा केला. त्यानंतर ठाकुर यांनी स्कायवाॅकवरून डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडी भागात फेरीवाले कोठुन सामान आणतात. या फेरीवाल्यांना डाॅ. राॅथ रस्त्यावरील कोणते दुकानदार सामान ठेवण्यासाठी जागा देतात याची टेहळणी केली. ठाकुर यांनी ग आणि फ प्रभागातील आणि मध्यवर्ति फेरीवाला हटाव पथकाला वेगळ्या रस्त्याने उर्सेकरवाडी, राॅथ रस्ता भागात येण्यास सांगितले.

ठाकुर यांनी कामगारांना कारवाईचा इशारा करताच, पालिका अधिकारी कारवाईला येत आहेत याची चाहुल फेरीवाल्यांना लागली. त्यांनी तात्काळ आपले सामान काही दुकानांमध्ये लपून ठेवले. परंतु ठाकुर यांचे फेरीवाले, सामान ठेवण्यास देणाऱ्या दुकानदारांवर लक्ष ठेऊन होते. फेरीवाला हटाव पथक येताच साहाय्यक आयुक्त ठाकुर, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांनी कारवाई पथकासह संबंधित दुकानात घुसून फेरीवाल्यांच माल ओढुन काढला. अशाप्रकारे दुकाने, उर्सेकरवाडीतील फेरीवाल्यांचा तीन टेम्पो माल पथकाने जप्त केला.

काही फेरीवाले लपण्यासाठी स्कायवाॅकवर जात होते. त्यांना ठाकुर यांनी रोखुन त्यांचे सामान जप्त केले. अचानक झालेल्या या कारवाईने फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. ग प्रभागात जप्त केलेले सामान कामगार परत करत आहेत. त्यामुळे फेरीवाले शिरजोर झाल्याच्या तक्रारी आहेत. आयुक्त अभिनव गोयल यांनी डोंबिवलीतील फेरीवाले कायमचे हटविण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे, असे सांगितले.