कल्याण : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील दीडशे मीटरच्या आत एकही फेरीवाला बसता कामा नये, पालिकेच्या ग, फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे, असे वारंवार निर्देश देऊनही दोन कामगारांनी आपल्या कामाकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणी आयुक्त अभिनव गोयल यांनी ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
कमलाकर सोनावणे आणि रवी बर्वे अशी निलंबित केलेल्या कामगारांची नावे आहेत. पालिका उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील दोन कामगारांना आयुक्तांनी अन्य प्रभागात कामासाठी नियुक्त केले. मागील तीस वर्षाच्या कालावधीत प्रथमच डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्याची आक्रमक कार्यवाही पालिकेच्या फ आणि ग प्रभागाकडून सुरू आहे.
फ प्रभागातील फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, इंदिरा चौक भागातील फेरीवाले, मानपाडा रस्त्यावरील फेरीवाला बेकायदा बाजार हटविण्यात अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर, फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांना यश आले आहे. डोंबिवली पूर्व ग प्रभागातील डाॅ. राॅथ रस्ता, पाटकर रस्ता, कामत मेडिकल गल्ली, उर्सेकरवाडी गल्ली आणि भाजी मंडई, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी, वाहतूक कार्यालय, राजाजी रस्ता भागातील फेरीवाले हटण्यास तयार नाहीत. या पथकातील काही कामगार आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याच्या तक्रारी आयुक्त, उपायुक्तांना प्राप्त होत आहेत. स्थानिक, नगरसेवकांकडूनही याबाबत लक्ष वेधण्यात आले. कामगार आणि फेरीवाल्यांमध्ये होत असलेल्या समन्वयाविषयी काही दृश्यचित्रफिती वरिष्ठांना मिळाल्या होत्या. यामुळे प्रशासनाने दोघांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. या नोटिसांना समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने आयुक्त गोयल यांनी निलंबनाची कारवाई केली.
मध्यवर्तीची पथकाची लुडबुडीने स्थानिक कामगार त्रस्त
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भाग फेरीवाल्यांनी गजबजलेला असताना त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पालिका मुख्यालयातील मध्यवर्ती फेरीवाला हटाव पथक नियमित डोंबिवलीत येऊन कारवाईचा देखावा करत असल्याने स्थानिक कामगार त्रस्त आहेत. डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील बहुतांशी फेरीवाले हटविण्यात आले आहेत. तरीही मुख्यालय मध्यवर्ती फेरीवाला हटाव पथकाने टिटवाळा, कल्याण पश्चिमेतील फेरीवाला हटविण्याची कारवाई करण्याऐवजी हे पथक डोंबिवलीत तळ ठोकुन राहत असल्याने वरिष्ठांनी या पथकातील कामगारांचे कार्यवाहीबाबतचे नियोजन करण्याची मागणी काही कर्मचारी करत आहेत.
