डोंबिवली – सलग तीन महिने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटवुनही पालिकेच्या ग प्रभाग हद्दीतील डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडी, भाजी मंडईतील फेरीवाले आपले बस्तान हटविण्यास तयार नसल्याने पालिका अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी (१४) कल्याण डोंबिवली पालिका कार्यालयाला सुट्टी असल्याने ग प्रभागाचे कामगार फेरीवाल्यांना हटविण्यासाठी येणार नाहीत याचा गैरफायदा घेत रविवारी संध्याकाळपासून फेरीवाल्यांचे जथ्थे डाॅ. राॅथ रस्त्यावर येऊन रस्ते अडवून व्यवसाय करत होते. त्यामुळे नागरिकांना या भागातून चालणे अवघड झाले होते.

आयुक्त अभिनव गोयल यांनी रस्ते, पदपथ नागरिकांना चालण्यास मोकळे पाहिजेत. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या अंतरावर आणि परिसरात रस्ते, पदपथावर एकही फेरीवाला दिसता कामा नयेत असे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी डोंबिवलीत सलग तीन महिने सकाळ, संध्याकाळ फेऱ्या मारून रात्री उशिरापर्यंत थांबुन ग आणि फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर, तत्कालीन साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या साहाय्याने डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील अनेक वर्षाचे ठाण मांडून बसलेले, उर्सेकरवाडीतील भाजीमंडईतील भाजीच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून फेरीवाल्यांचे कंबरडे मोडले होते. दररोज दोन ते तीन टेम्पो साहित्य फेरीवाल्यांचे जप्त केले जात होते.

या सततच्या कारवाईमुळे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करणे अशक्य असल्याने अनेक फेरीवाल्यांनी पूर्व भागातून आपले बस्तान हलविले होते. दरम्यानच्या काळात ग प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त भारत पवार यांचा फेरीवाल्यांवर कारवाई करताना दोन महिन्यापूर्वी पाय मुरगळला. ते वैद्यकीय रजेवर गेले. आपल्या विरूध्द आक्रमक कारवाई करणारा तडफदार अधिकारी रजेवर गेल्याची माहिती समजल्यावर फेरीवाल्यांनी पुन्हा ग प्रभागात येऊन ठाण मांडण्यास सुरूवात केली.

ग प्रभागात नवीन साहाय्यक आयुक्त, फेरीवाला हटाव पथकात नवीन कामगार आल्यानंतर फेरीवाल्यांनी त्यांना दाद न देता आपले दुकाने दिवसाढवळ्या थाटण्यास सुरूवात केली. ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील नवीन बदली कामगार या फेरीवाल्यांची पाठराखण करत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. त्यामुळेच ग प्रभागात पुन्हा फेरीवाल्यांनी आपले बस्तान ठोकले असल्याची चर्चा आहे.

उर्सेकरवाडीतील भाजीचे गाळे फेरीवाल्यांनी पुन्हा गाळेधारकांकडून भाड्याने घेतल्याची चर्चा आहे. रेल्वे स्थानकाजवळचे स्वच्छतागृह फेरीवाले आपले सामान ठेवण्यास वापरत आहेत. फ प्रभागातील नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, बापूसाहेब फडके रस्ता, बाजीप्रभू चौक रस्ता फेरीवाला मुक्त करण्यास फ प्रभागातील कामगार, अधिकाऱ्यांना यश आले आहे. मग ग प्रभागात फेरीवाल्यांची दादागिरी कामगार, अधिकारी का खपून घेत आहेत असे प्रश्न नागरिक करत आहेत. ग प्रभागातील फेरीवाल्यांच्या या घुसखोरीमुळे मागील तीन महिने फ आणि ग प्रभागाच्या पालिका अधिकारी, उपायुक्तांनी केलेल्या मेहनतीवर बोळा फिरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.