Dombivli building wall collapse: मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी रात्री डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभेसमोरील कर्करोग रुग्णालयाच्या (जुनी सुतिकागृह इमारत) उभारणीसाठी खोदण्यात आलेल्या सुमारे ५० फूट खोल खड्ड्याची माती खचली. या खड्यातील माती खचण्याने आजुबाजुला असलेल्या एका इमारतीची संरक्षक भिंत पूर्णपणे खड्डयात कोसळली, तर अन्य एका इमारतीच्या संरक्षक भिंतीला तडे गेले. या प्रकाराने या भागात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मागील दोन दिवसापूर्वी टिळक रस्त्यावरील जुने गोमांतक हाॅटेल गल्लीत महावितरणचे रोहित्र कोसळले होते. त्यानंतर या गल्लीतील रस्त्यावरील सीमेंटच्या रस्त्याला तडाही गेला होता. त्याचवेळी परिसरातील रहिवाशांना कर्करोग रुग्णालयासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे या हालचाली होत असल्याची जाणीव झाली होती. ती अखेर खरी ठरली. मागील दोन वर्षापासून टिळक रस्त्यावर पालिकेच्या जुन्या सुतिकागृहाच्या जागेवर २५० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारले जात आहे. ५० खाटांचे सामान्य रुग्णालय याठिकाणी आहे. अतिशय संथगतीने हे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

संरक्षक भिंत कोसळली

मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पहिल्याच पावसाने कल्याण, डोंबिवली शहरांची दैना उडवली आहे. नागरी वस्तीत तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पालिका अधिकारी, नगरसेवक रात्रंदिवस काम करत आहेत. अशा परिस्थितीत टिळक रस्त्यावरील सुतिकागृहाच्या जागी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील माती पावसाने भुसभुशीत होऊन या खड्ड्याच्या वरील भागात असलेल्या बाजुच्या मैत्री रुक्मिणी सदन इमारतीची सामासिक अंतरावरील संरक्षक भिंत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक खड्ड्यात कोसळली. त्याच बरोबर बाजुच्या सायं विसावा इमारतीच्या सामासिक अंतरातील संरक्षक भिंतीला तडे गेले. रात्रीच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने परिसरातील रहिवासी जागे झाले. त्यांना कर्करोग रुग्णालया भोवतीच्या इमारतींच्या संरक्षक भिंती कोसळल्याचे समजले.

या खड्ड्याभोवती असलेल्या इमारतींमधील रहिवाशांमध्ये या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच शहर अभियंता अनिता परदेशी, प्रकल्प अभियंता सखदेव, साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपमहापौर राहुल दामले, नगरसेविका रंजना पेणकर, माजी नगरसेवक राजन आभाळे यांनी घटनास्थळी पाहणी करून तातडीने आवश्यक त्या काळजीच्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. कर्करोग रुग्णालयाचेे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारही घटनास्थळी दाखल झाले. पालिका अभियंते आणि सल्लागारांच्या समन्वयातून खड्ड्यातून अत्याधुनिक तंत्राचा वापर करून मजबुत आधार भिंत उभारणीचा निर्णय घेण्यात आला.

खोदकामाचे खड्डे जीवावर

कल्याण, डोंबिवली शहरांच्या अनेक भागात पालिका नगररचना विभागाकडून ४०० ते ५०० चौरस मीटरच्या भूखंडांवर इमारत उभारणीचे बांधकाम आराखडे मंजुर करण्यात येत आहेत. या आटोपशीर, अडगळीच्या जागेत इमारतीचा पाया खोदण्यासाठी ठेकेदार आजुबाजुच्या इमारती, वस्तीला धोका निर्माण होईल अशा पध्दतीने खोदकाम करत असल्याने परिसरातील रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत. याविषयी उघड बोलले, पालिकेत तक्रारी केल्या तर विकासकाच्या समर्थकांकडून दादागिरी होण्याची शक्यता असल्याने कोणी याविषयी उघडपणे बोलत नाहीत. आटोपशीर जागेतील भूखंडावर पायाचा खड्डा खोदताना पालिकेने नवीन नियमावली प्रसिध्द करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील मातीचा भाग पावसामुळे भुसभुशीत होऊन खचला. आणि त्यामुळे बाजुच्या इमारतींच्या संरक्षक भिंतींना धोका निर्माण झाला. या संरक्षक भिंतींच्या बाजुने खड्ड्याच्या आतील भागातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत आधारभिंत उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे.-अनिता परदेशी शहर अभियंता.