Dombivli Hospital Assault Eknath Shinde and Ravindra Chavan’s silence sparks outrage: राज्यातील कोणत्याही भागात जाहीर सभा, मेळाव्याला गेले की या समोर बसल्या आहेत या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. या बहिणींवर कधीही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी नेहमीच भाषा करणारे शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर मारहाण प्रकरणावर मौन बाळगून आहेत.
डोंबिवलीत कुठेही लहान बाळाची पाचवी, बारसे, बालके, लग्नाचा वाढदिवस, अंत्येष्टीचा दशक्रिया विधीसाठी धावणारे, वाढदिवसाच्या दिवशी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाला अत्याधुनिक मशिन भेट किंवा तेथे फळ वाटप करून लोकांना आपलेसे करणारे डोंबिवली विधानसभेचे स्थानिक आमदार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणही आपल्या शहरात डाॅक्टर मारहाणीची एवढी मोठी घटना घडूनही शांत बसल्याने वैद्यकीय क्षेत्रासह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हे दोन्ही नेते कल्याण, डोंबिवली शहर परिसरात अन्याय, अत्याचार, न्याय मागण्यासारखी घटना असेल तेथे आधारस्तंभासारखे, संकट मोचक म्हणून उभे राहतात. मग आपल्या डोंबिवली मतदारसंघात पालिकेच्या दोन डाॅक्टरांना शिवसेनेचा मुजोर नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी अश्लिल शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. परिचारिकांना दमदाटी केली. या सगळ्या प्रकाराने शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका, सेवक वर्ग प्रचंड तणावाखाली आला. राज्यभर याचे पडसाद उमटले. अशावेळी आम्हाला आधारस्तंभासारखे वाटणारे, आम्हाला नेहमीच न्याय देणारे आमचे, डोंबिवलीचे ‘पप्पा’ भाजपचे स्थानिक आमदार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले कुठे, असे प्रश्न कल्याण डोंबिवली पालिकेचा प्रचंड मानसिक तणावाखाली असलेला आरोग्य विभागातील कर्मचारी विशेषता महिला डाॅक्टर, परिचारिक उपस्थित करत आहेत.
पप्पा, दादा गेले कुठे?
आठवड्यातील तीन ते चार दिवस प्रदेशाध्यक्ष चव्हाण डोंबिवली शहराच्या विविध भागात रस्ते कामांची उद्घाटने, कोणाचा वाढदिवस, बारशी, धार्मिक विधी अशा कार्यक्रम धावती का होईना हजेरी लावून जातात. आमदार चव्हाण यांच्याकडे एकदा का विषय मांडला की त्याला न्याय मिळाला. तो विषय मार्गी लागला अशी धारणा कर्मचारी, नागरिकांची आहे. त्यामुळे अनेक पालिका कर्मचारी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे चाहते आहेत. आपल्या मतदारसंघात एवढी मोठी घटना घडुनही चव्हाण काही क्षणही शास्त्रीनगर रुग्णालयातील भेदरलेल्या डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी यांना भेटण्यास आले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शास्त्रीनगर रुग्णालयात विविध प्रकारची रुग्ण सेवेची यंत्रणा देण्यात, पालिका रुग्णालयांमध्ये ९० वैद्यकीय कर्मचारी तात्काळ भरती करण्याचे शासकीय आदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैद्यकीय आरोग्य मंत्री असताना दिले होते. आपल्या मतदारसंघातील रुग्णांची शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्ण सेवा केली जाते. याची जाणीव असुनही आमच्या नव्या उमेदीचे सहकारी महिला, पुरूष डाॅक्टर यांना बेदम मारहाण, परिचारिकांना घाणेरड्या शिव्यांची लाखोली वाहूनही चव्हाण आमची साधी विचारपूस करण्यास फिरकले नाहीत. घडल्या प्रकाराविषयी एक साधी प्रतिक्रिया कुठे त्यांनी, त्यांच्या पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कधी कुठे दिली नाही, याविषयी खासगी डाॅक्टर, डोंबिवली शहर परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
पालक शहरे बेघर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवली, कल्याण परिसरात आले की त्यांच्याकडे अन्यायग्रस्त नागरिक न्यायासाठी अर्ज द्यायचे. त्यांच्या अर्जावर विचार केला जात होता. कल्याण, डोंबिवली ही नेहमीच आपली पालक शहरे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वागवली. या शहरांमध्ये नागरी सुविधा देण्यात पुढाकार घेतला. असे हे दोन्ही नेते, या शहरांचे, आमचे पप्पा आमच्यावर झालेल्या अन्यायाच्यावेळी आमच्या दिशेने फिरकले नाहीत याविषयी पालिका रुग्णालयातील कर्मचारी तीव्र नाराज आहेत.
याविषयी भाजप, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी, या दोन्ही नेत्यांशी संपर्क साधला. तो होऊ शकला नाही. ते अधिवेशनात आहेत असे सांगण्यात आले. या विषयांवर आमचे वरिष्ठ नेते बोलतील असे भाजप, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
