डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत जुनी डोंबिवली भागातील एका ३७ वर्षाच्या आईसक्रिम विक्रेत्याचा आईसक्रिम ठेवण्याच्या शीतकपटातील वीज वाहक तारांचा धक्का लागून मृत्यू झाला. या आईसक्रिम विक्रेत्याला तात्काळ उपस्थितांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

जगदीश लाल गाडरी (३२) असे आईसक्रिम विक्रेत्याचे नाव आहे. ते जुनी डोंबिवलीतील वैभव मंगल कार्यालयाजवळील ताराबाई चाळीत आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. मागील अनेक वर्ष ते जुनी डोंबिवली भागात आईसक्रिम विक्रीचा व्यवसाय करतात. जगदीश गाडरी यांच्या मृत्युप्रकरणी गणेश कुमावत यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी या माहितीवरून, वैद्यकीय अहवालावरून घडल्या घटनेची पोलीस रोजनिशीत नोंद करून घेतली. कुमावत हे वेल्डर म्हणून काम करतात. ते मुळचे राजस्थानमधील रहिवासी आहेत. सध्या ते कुटुंबीयांसह मोठागावमधील लोटेवाडी भागात राहतात.

जगदीश गाडरी यांचा आईसक्रिम विक्रीचा व्यवसाय असल्याने त्यांच्या दुकानात आईसक्रिम ठेवण्याचे मोठे शीतकपाट होते. या शीतकपाटाची ते नियमित विद्युत तारतंत्रीकडून देखभाल दुरूस्ती करून घेत होते. नियमित बर्फ, पाण्याशी शीतकपाटाचा संपर्क येत असल्याने या शीतकपाटाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही याची काळजी ते घेत होते. आपले शीतकपाट सुस्थितीत आहे याची जाणीव असल्याने ते सर्रास आईसक्रिम ग्राहकांना देताना, ठेवण्यासाठी सहजपणे वापर करत होते.

बुधवारी ते आपल्या आईसक्रिम विक्री दुकानात सकाळपासून कार्यरत होते. ग्राहक सेवा देत होते. दिवसभर आईसक्रिम ठेवण्याचे शीतकपाट सुस्थितीत होते. संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान ते शीतकपाट उघडून आईसक्रिम काढत असताना त्यांना शीतकपाटात जीवंत विद्युत प्रवाह आल्याचे जाणवले. पाणी, जीवंत वीज प्रवाह एकाचवेळी एकाच ठिकाणी आल्याने शीतकपाटाला हात लावत असतानाच आईसक्रिम विक्रेते जगदीश गाडरी यांना विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. ते मोठ्याने ओरडून जमिनीवर कोसळले. उपस्थित ग्राहकासह आजुबाजुच्या व्यापाऱ्यांना आईसक्रिम विक्रेत्याच्या दुकानात मोठ्याने आवाज झाल्याने ते दुकानाच्या दिशेने धावले. त्यावेळी जगदीश बेशुध्द होऊन दुकानात कोसळले होते. तात्काळ जगदीश यांच्या नातेवाईकांना शेजारील व्यापाऱ्यांनी बोलावून घेतले. त्यांना तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी डाॅक्टरांनी त्यांना तपासून ते मृत घोषित केले. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे याप्रकरणाचा तपास करत आहेत.