डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली भागात नेमाडे गल्लीत ‘आरव हाईट्स’ नावाची बेकायदा इमारत उभारल्याने कल्याण-डोंबिवली पालिकेच्या ‘ह’ प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी ही इमारत अनधिकृत घोषित करून संबंधित एका भूमाफिया विरुद्ध ‘एमआरटीपी’चा गुन्हा दाखल केला. ही इमारत एकूण २३ भूमाफियांनी संगनमत करून उभारली आहे. शिंदे शिवसेनेचा कोपर प्रभागाचा नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याचा मुलगा प्रवीण याचाही या बांधकामात सहभाग आहे. या गुन्ह्यात प्रवीण म्हात्रेसह इतरांची नावे समाविष्ट करावी, या मागणीसाठी आपण मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती याप्रकरणातील तक्रारदार कल्पेश गंगाराम जोशी यांनी दिली.

जुनी डोंबिवलीतील नेमाडे गल्लीतील टेल्कोसवाडीतील भूमापन क्रमांक २६-१४, २६-१५, २६-१६ अ या जमिनीवरील ११ वर्षांपूर्वी २३ भूमाफियांनी एकत्रित ‘आरव हाईट्स’ नावाची बेकायदा इमारत उभारली. ती उभारताना कल्याण-डोंबिवली पालिका नगररचना विभाग, शासनाच्या महसूल विभागाच्या आवश्यक बांधकाम परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. ‘आरव हाईट्स’ ही बेकायदा इमारत उभी राहिलेल्या जमिनीचे बनावट सातबारा उतारे, फेरफार भूमाफियांनी संगनमत करून घेतले. पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करण्यात आल्या. या बनावट कागदपत्रांच्या आधारे २३ भूमाफियांनी या सात मजली, दोन विंग असलेली बेकायदा इमारत उभारली.

या जमिनीशी कोणताही संबंध नसताना नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याचा मुलगा प्रवीण यांचे नाव या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर घुसविण्यात आले. या इमारतीतील काही हिस्सा त्यांना देण्यात आला. या सर्व बेकायदा इमारत, बनावट कागदपत्र प्रकरणी कल्पेश जोशी यांनी गेल्या चार ते पाच वर्षात पालिका, महसूल विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु, राजकीय दबावांमुळे कल्पेश यांच्या तक्रारीची कोणत्याच शासन यंत्रणेने दखल घेतली नाही. सतत पाठपुरावा सुरू ठेवल्यानंतर पालिकेच्या ‘ह’ प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी ‘आरव हाईट्स’ इमारत अनधिकृत घोषित केली. या बेकायदा इमारत प्रकरणी २०१७ मध्ये महेश मंगेश पार्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या बेकायदा इमारत प्रकरणात इतरही २३ भूमाफिया सहभागी असल्याने गुन्हा फक्त महेश पार्टे यांच्यावर दाखल झाल्याने तक्रारदाराने या प्रकरणी इतर २२ जणांविरोधात ‘एमआरटीपी’ गुन्हा दाखल करावा, असा पालिकेकडे दहा वर्षापासून तगादा लावला आहे. या तक्रारीची पालिका दखल घेत नाही. त्यामुळे प्रवीण म्हात्रेसह इतरांची नावे या ‘एमआरटीपी’ गुन्ह्यात दाखल करावी या मागणीसाठी तक्रारदार जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

बेकायदा जमीन महसुलीची सातबारा उतारा व इतर बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात प्रवीण फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. महिनाभरापू्र्वी पोलिसांनी प्रवीणला अटक करण्याचे आश्वासन तक्रारदाराला दिले होते. हे आश्वासन न पाळल्याने तक्रारदाराने पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. याप्रकरणात अन्य एका इसमाला अटक करण्यात आली आहे.

पालिका, पोलिसांकडे पाठपुरावा करूनही प्रवीण म्हात्रेचे नाव ‘एमआरटीपी’ गुन्ह्यात दाखल केले जात नसल्याने याप्रकरणी अखेर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय कल्पेश जोशी यांनी घेतला आहे. पोलिसांना सापडत नसलेला व फरार असलेला प्रवीण रमेश म्हात्रे १५ ऑगस्ट रोजी डोंबिवलीत दिवसा काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत उजळ माथ्याने पोलिसांच्या बाजुला चालत होता, असे तक्रारदार आणि अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.