कल्याण – डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील गायकवाडीत एका रहिवाशाने अनधिकृत बंगल्याचे बांधकाम केले आहे. या बेकायदा बांधकामाला पालिकेच्या नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या नाहीत. हे बांधकाम करणाऱ्या इसमांवर पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांनी एमआरटीपीचा गुन्हा दीड वर्षापूर्वी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. तरीही ह प्रभागाकडून या बेकायदा बंगल्यावर कारवाई केली जात नाही. त्याच्या निषेधार्थ याप्रकरणातील तक्रारदार ज्योती म्हात्रे यांनी सोमवारपासून पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयासमोर रणरणत्या उन्हात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

जोपर्यंत डोंबिवली पश्चिमेतील गायकवाडवाडीतील बेकायदा बंगल्यावर भुईसपाट करण्याची कारवाई होत नाही. तोपर्यंत आपण आपले बेमुदत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्या ज्योती म्हात्रे यांनी घेतली आहे. गायकवाडवाडीत बंगला उभारणाऱ्या इसमाने आम्हाला राहत्या घरातून हाकलून दिले आहे. आम्हाला बेघर केले आहे, असा तक्रारदार महिलेचा आरोप आहे. महापालिकेच्या डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना या बेकायदा बंगल्या प्रकरणी मागील दोन वर्षात अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यांनी संबंधित बांधकामधारकाला बंगल्याच्या बांधकाम परवानगी आणि जमीनविषयक कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटिसा दिल्या होत्या. या नोटिसांना संबंधित बांधकामधारकांने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हे बंगल्याचे बांधकाम ह प्रभाग अधिकाऱ्याने अनधिकृत घोषित केले आहे. बांधकाम अनधिकृत घोषित केल्यानंतर संबंधित बंगले मालकावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात एमआरटीपीचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे बंगल्याचे बेकायदा बांधकाम तोडून टाकणे ही ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांची जबाबदारी होती. पण त्यांनी गेल्या दीड वर्षाच्या काळात फक्त टाळाटाळ करून या बेकायदा बंगले आणि त्यांच्या मालकांची पाठराखण केली आहे. साहाय्यक आयुक्त सावंंत यांनी निष्पक्ष न राहता आपण तक्रार केलेल्या बेकायदा बांधकामांसह ह प्रभाग हद्दीतील अनेक बेकायदा बांधकामांची पाठराखण केली आहे. त्या तक्रारदारांच्या तक्रारींना सावंत यांनी केराची टोपली दाखवली आहे. शासनाच्या तक्रारींचीही ते दखल घेत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित करावे. त्यांची विभागीय चौकशी करावी, अशी आपली मागणी आहे.

जोपर्यंत साहाय्यक आयुक्त सावंत गायकवाड वाडीतील बेकायदा बंगला जमीनदोस्त करण्याची कारवाई करत नाहीत तोपर्यंत आपण आपले बेमुदत उपोषण मागे घेणार नाही. उपोषण सोडावे म्हणून आपल्यावर विविध स्तरातून दबाव येत नाही. पण आता मागे हटणार नाहीत, असे उपोषणकर्त्या ज्योती म्हात्रे यांनी सांगितले.