डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत मागील वर्षभर थंडावलेली बेकायदा बांधकामे पुन्हा जोमाने सुरू झाली आहेत. पश्चिमेतील गरीबाचापाडा सरोवरनगर येथील नक्षत्र ढाब्यात अशाच एका खोलीच्या बांधकामावरून आणि गॅरेज तोडण्यावरून झालेल्या वादात मोठ्या भावाने (मधला) आपल्या सख्ख्या लहान भावाला शिवीगाळ करत मारहाण केली. या मोठ्या भावाच्या साथीदाराने लहान भावावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश सुखदेव म्हात्रे असे हल्ला झालेल्या लहान भावाचे नाव आहे. ते डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा सरोवरनगर येथील चाळीत कुटुंबीयांसह राहतात. ते मासळी विक्रीचा व्यवसाय करतात. निलेश यांचा मोठा भाऊ नरेश म्हात्रे यांनी आपला साथीदार श्रीकांत साळुंखे यांच्या मदतीने निलेश यांना मारहाण केली. एमआयडीसीतील एम्स रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

निलेश म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की माझ्या वडिलांच्या मालकीच्या जागेवर खोली बांधली होती. या खोलीमुळे आपला मोठा भाऊ नरेश दुखावला होता. त्याने आपल्या खोलीच्या बांधकामाविरोधात पालिकेच्या ह प्रभागात तक्रार करून ही खोली पाडण्यासाठी पाठपुरावा केला होता. चार दिवसापूर्वी नरेश यांच्या तक्रारीवरून पालिकेच्या ह प्रभाग अतिक्रमण नियंत्रण पथकाने साहाय्यक आयुक्त विजय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बांधलेली खोली तोडून टाकली होती. त्यावेळी आपण तोडकाम पथकाला आपण गरीबाचापाडा हरीओम पूजा टाॅवर, उमिया संकुलाच्या बाजुला नरेश आणि श्रीकांत साळुंखे यांनी भागीदारीतून जे सर्व्हिस सेंटर सुरू केले आहे ते पण तोडून टाका, अशी मागणी केली. त्यावेळी नरेशने आपल्यासह आई, वडिलांना शिवीगाळ केली. त्यामुळे आई लक्ष्मी हिने नरेश विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता नरेशने शिवीगाळ सुरू केली. तू आमचे सर्व्हिस सेंटर पाडतोस काय, तुला माज आला आहे काय, असे प्रश्न करत नरेशने आपणास घट्ट मिठी मारली. त्यावेळी आक्रमक होत श्रीकांत साळुंखे जवळील चावीच्या साखळीतील चाकूने आपल्यावर वार केले. छातीतून रक्त येऊ लागल्याने निलेशच्या मित्रांनी तात्काळ पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यानंतर विष्णुनगर पोलीस ठाण्यात नरेश, श्रीकांत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ११०, ११८(२), ३(५), ३५१(२), ३५२ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.