डोंबिवली : डोंबिवली, कल्याण शहरांमध्ये रस्ते, पदपथ अडवून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता फटाके विक्रेत्यांनी फटाके विक्रीचे स्टाॅल लावले आहेत. या मंचांमुळे कल्याण, डोंबिवली शहरे दररोज वाहन कोंडीत अडकत आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिक रस्ते अडवून उभारलेल्या या फटाके विक्रीविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. डोंबिवलीत पालिकेच्या ‘ह’ प्रभागाच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने बेकायदा फटाके विक्रेत्यांवर कारवाई केली.

अचानक सुरू झालेल्या या कारवाईने फटाके विक्रेत्यांची तारांबळ उडाली. फटाके विक्रीचा मंच लावण्यापूर्वी विक्रेत्यांनी पालिका, वाहतूक विभाग, पोलीस यांच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. अनेक विक्रेत्यांनी आमदार, नगरसेवक यांचा आशीर्वाद घेऊन पालिकेच्या परवानग्या न घेता डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागात फटाके विक्रीचे मंच उभारले आहेत.

डोंबिवलीत कारवाई

पालिकेच्या परवानग्या न घेता डोंबिवली पश्चिम ‘ह’ प्रभाग हद्दीत, रेल्वे स्थानक भागात, रस्ते, पदपथ अडवून फटाके विक्रीचे मंच उभारण्यात आल्याची माहिती मिळताच ‘ह’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त विजय भोईर यांनी फेरीवाला हटाव व अतिक्रमण नियंत्रण पथक सोबत घेऊन खनन यंत्राच्या (जेसीबी) साह्याने डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील फटाके विक्रेत्यांवर कारवाई केली. या फटाके विक्रेत्यांकडे पालिकेच्या परवानग्या साहाय्यक आयुक्त भोईर यांनी मागितल्या. एकाही फटाके विक्रेत्याने पालिकेची परवानगी घेतली नसल्याचे समजल्यावर साहाय्यक आयुक्त भोईर यांच्या आदेशावरून तोडकाम पथकाने रेल्वे स्थानक भागातील महात्मा फुले रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, दीनदयाळ रस्ता, महात्मा गांधी रस्ता भागातील रस्ते, पदपथांना अडथळा ठरणारे फटाके विक्रीचे मंच खनन यंत्राच्या साह्याने तोडून टाकले.

पालिकेच्या परवानग्या न घेता विक्रेत्यांनी पु्न्हा स्टॉल उभारून फटाके विक्री केली तर या स्टॉलवर अग्निशमन विभागाच्या साह्याने पाण्याचे फवारे मारण्याचे नियोजन पालिकेकडून केले जात आहे. मागील पाच वर्षापूर्वी असे प्रयोग पालिकेने केले होते. आपण फटाके विक्रीचा स्टॉल लावला व अचानक त्याच्यावर पालिकेने पाण्याचा फवारा मारला तर नुकसान होईल या भीतीने फटाके विक्रेते तसे करण्यास घाबरत आहेत.

राजकीय दबाव

फटाके विक्रेत्यांवर कारवाई करू नये. दिवाळीचे फक्त पाच दिवस असतात. या दिवसात बेरोजगारांना काम मिळते, असे अधिकाऱ्यांना सांगून काही राजकीय मंडळी फटाके विक्री स्टॉलवर कारवाईस अधिकाऱ्यांना मज्जाव करत आहेत. त्यात नगरसेवकांचा सर्वाधिक सहभाग आहे. अनेक कार्यकर्ते हे नगरसेवकांचे समर्थक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हवा प्रदूषण टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर कठोर निर्बंध घातले आहेत. तरीही कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत रस्तोरस्ती फटाके विक्री जोरात सुरू असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. आपल्या कौटुंबिक कारणासाठी आयुक्त अभिनव गोयल आपल्या गावी गेले आहेत. ते रजेवर असल्याने त्याचा गैरफायदा प्रभागातील अधिकारी घेऊन ते फटाके विक्रेत्यांना अभय देत असल्याच्या तक्रारी आहेत.

विक्रेत्यांना अभय

एकीकडे फटाके विक्री स्टॉलवर कारवाई करायची. आणि तेच स्टॉल पुन्हा उभे करण्यासाठी विक्रेत्यांकडून दहा हजार रूपये घ्यायचे असेही प्रकार पालिका हद्दीत काही कामगारांकडून सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. पालिका अधिकाऱ्यांना कारवाईचा देखावा न करता पर्यावरण संवर्धन, नागरिकांना रस्ते, पदपथावर होणारी अडचण विचारात घेऊन फटाके विक्री स्टॉलवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.