डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा भागातील अनमोलनगरी भागातील १०० फूटी बाह्यवळण रस्त्यावर (रिंगरूट) मागील चार महिन्यांपासून बेकायदा बाजार दर गुरूवारी भरवला जात होता. काही स्थानिक दादा-भाई या बेकायदा बाजाराचे नियोजन करत होते. या बेकायदा बाजाराची माहिती गुरूवारी संध्याकाळी पालिका ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त अभिमान पवार यांना मिळताच, त्यांनी फेरीवाला हटाव पथकाच्या माध्यमातून या बेकायदा बाजारातील दोन हजार फेरीवाल्यांवर कारवाई केली.
मागील चार महिन्यांपासून दर गुरूवारी संध्याकाळी चार ते रात्री ११ वाजेपर्यंत हे फेरीवाले व्यवसाय करत होते. या बेकायदा बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू, भाजीपाला, गृहपयोगी सामान स्वस्त दरात मिळत असल्याने डोंबिवली शहराच्या विविध भागातील नागरिक याठिकाणी खरेदीसाठी येत होते. डोंबिवली पश्चिम ह प्रभागातील गणेशनगर वृंदावन सोसायटी, गणेश टाॅवर परिसरातील, कोपर, देवीचापाडा कलावती आई मंदिर भागातील बेकायदा बाजार साहाय्यक आयुक्त अभिमान पवार यांनी राजकीय दबावाला बळी न पडता गेल्या चार महिन्याच्या कालावधीत बंद पाडले.
आयुक्त अभिनव गोयल यांनी फेरीवाले, बेकायदा बाजारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे अनमोलनगरी गरीबाचापाडा भागातील बेकायदा बाजाराची माहिती मिळताच गुरूवारी साहाय्यक आयुक्त पवार आणि फेरीवाला हटाव पथकाने संध्याकाळी सहा ते रात्री साडे आठ वाजेपर्यंत या बेकायदा बाजारावर कारवाई केली. सुमारे दोन हजार फेरीवाले या बेकायदा बाजारात ठाण मांडून बसले होते.
फेरीवाल्यांची पळापळ
संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ह प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक या बाजारात येताच फेरीवाल्यांची पळापळ झाली. बाह्यवळण रस्त्याचा एक टप्पा गरीबाचापाडा भागात पूर्ण झाला आहे. या रस्त्यावरून अद्याप वाहनांची वर्दळ सुरू झाली नाही. त्यामुळे फेरीवाले या रस्त्याचा वापर बेकायदा बाजार भरविण्यासाठी करत होते. ही कारवाई सुरू होताच या बेकायदा बाजारात हप्ता वसुलीसाठी जमा झालेले दादा, भाई आणि काही लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या रस्त्याने, बुलेट वरून पळून गेले. दर गुरूवारी बेकायदा बाजार भरला की काही लोकप्रतिनिधी, काही वसुलीधारक या बेकायदा बाजारालगतच्या भागात तळ ठोकुन बसत होते, अशी माहिती अनमोलनगरी भागातील काही नागरिकांनी दिली. देवीचापाडा भागातील कलावती आईमंदिर रस्त्यावरील मोकळ्या जागेत मे मध्ये काही स्थानिक दादा बेकायदा बाजार भरवत होते. पालिकेने या बाजारावर आक्रमक कारवाया केल्या. त्यामुळे हा बाजार बंद करून तो नंतर अनमोलनगरी जवळच्या बाह्यवळण रस्त्यावर भरविण्यात येऊ लागला. मागील चार महिन्यापासून हा बाजार भरविला जात होता, असे काही स्थानिकांनी सांगितले.
गरीबाचापाडा अनमोलनगरी परिसरातील बाह्यवळण रस्त्यावरील बेकायदा बाजार कायमस्वरूपी बंद केला. हा बाजार पुन्हा भरविण्याचा प्रयत्न झाला तर फेरीवाल्यांचे सर्व सामान जप्त करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. जयहिंद काॅलनी भागात एक बेकायदा बाजार भरत असल्याच्या तक्रारी आहेत तो बाजारही बंद केला जाणार आहे. ह प्रभाग हद्दीतील सर्व बेकायदा बाजार बंद करण्यात आले आहेत. – अभिमान पवार साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग. डोंबिवली.
