डोंबिवली – कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा येथील शेलार क्रीडा मैदानाच्या बाजुला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये शनिवारी छापा टाकून दिव, दमणहून आणलेला प्रतिबंधित सात लाख रूपये किमतीचा दारू साठा जप्त केला. या बेकायदा दारू साठ्याप्रकरणी पोलिसांनी डोंबिवली देसलेपाडा नवनीतनगरमधील तीन तस्करांच्या विरूध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
हिरेश शंकरभाई बक्कर उर्फ भानुशाली (३०), मनीष पुरुषोत्तमभाई धुकरे (४०), विपुल रामकृष्ण शुक्ला (२२) अशी गुन्हा दाखल इसमांची नावे आहेत. ते डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा नवनीतनगरमधील गोकुळधाम सोसायटीत राहतात.दिव, दमण येथील प्रतिबंधित दारू गुजरात, हरियाणा, राजस्थान राज्यात चोरीच्या मार्गाने विक्री करण्याकरिता पाठविण्यासाठी महाराष्ट्रातील डोंबिवलीतील खंबाळपाडा येथे आणली जाते. शेलार मैदानाच्या बाजुला असलेल्या एका शेडमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या दारूच्या बाटल्यांमध्ये ही दारू भरली जाते.
या दारूच्या बाटल्या बंदिस्त करून एका मोठ्या वाहिकेत (पाईप) भरून त्या वाहिका चिकटपट्टीने बंदिस्त करून टाकल्या जातात. या वाहिका विक्री करण्यासाठी चालविल्या आहेत असे दाखवून या बेकायदा दारूची तस्करी या तीन जणांकडून सुरू होती. यासंदर्भातची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे खंबाळपाडा शेलार क्रीडा मैदान भागात शुक्रवारपासून सापळा लावला. त्यांना एका शेडमध्ये काही गुप्त हालचाली चालत असल्याची पक्की माहिती मिळाल्यावर शनिवारी गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या दारू तस्करी अड्डयावर छापा टाकला.
पोलिसांना या शेडमध्ये वेगवेगळ्या दारू उत्पादक कंपन्यांच्या विविध मापातील बाटल्या आढळल्या. सात हजार ९२० दारू बाटल्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. काही बाटल्या दिव, दमण येथून आणलेल्या प्रतिबंधित दारूने भरल्या होत्या. या शेडमध्ये ९९ प्लास्टिकचे मोठ्या वाहिका (पाईप) आढळून आल्या. पोलिसांनी या दारूचे मूल्यांकन केल्यावर सात लाख ९२० रूपयांची ही दारू असल्याचे आढळले. पोलिसांनी वाहिकेसह सर्व दारू साठा, बाटल्या जप्त केला. याप्रकरणी ही तस्करी करणाऱ्या तीन जणांच्या विरूध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी करत आहेत.
हे तस्कर मागील किती महिने हा बेकायदा व्यवसाय करत होते. ते गुजरात, राजस्थान, हरियाणा व्यतिरिक्त अन्य कोणत्या राज्यात या दारूची तस्करी करत होते. महाराष्ट्राच्या विविध भागात या तस्कारीचे जाळे आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.ही कारवाई पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी, सर्जेराव पाटील, उपनिरीक्षक किरण भिसे, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, गुरूनाथ जरग, विजय जिरे, आदिक जाधव, दत्तप्रसाद महाजन, सुधीर कदम, सचीन भालेराव, सचीन कदम, पांडुरंग भांगरे, विलास कडु, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, प्रवीण किनरे, युवराज ठेपणे, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष रोकडे, सतीश सोनवणे, गणेश हरणे, पुनम खरात, मंगल गावीत, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल बोरकर यांच्या पथकाने केली.
